हत्या-आत्महत्या प्रकरणामागे प्रेमाच्या त्रिकोणाचा संशय
By Admin | Updated: October 21, 2016 01:41 IST2016-10-21T01:41:15+5:302016-10-21T01:41:15+5:30
गोंदियाच्या अंबाटोली परिसरात शेजारी-शेजारीच राहणाऱ्या प्रेमी युगलाने देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली.

हत्या-आत्महत्या प्रकरणामागे प्रेमाच्या त्रिकोणाचा संशय
आकाशच्या चिठ्ठीतून उघड : देशी कट्ट्याबाबत तपास सुरूच
गोंदिया : गोंदियाच्या अंबाटोली परिसरात शेजारी-शेजारीच राहणाऱ्या प्रेमी युगलाने देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून जीवनयात्रा संपविली. आकाश आणि काजलच्या प्रेमात तिसरी कोणी व्यक्ती डोकावल्याचा आणि काजल आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा संशय आल्याने आकाशने हे कृत्य केल्याचे आतापर्यंतच्या तपासात आढळून आले.
आकाश वैद्य आणि काजल मेश्राम यांचे मृतदेह बुधवारी सकाळी गोंदियापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाटोला-घिवारी या गावादरम्यान असलेल्या कालव्याच्या काठावर आढळल्याने खळबळ उडाली होती. आकाशने मंगळवारच्या रात्री काजलच्या डोक्यात गोळी घालून नंतर स्वत:वर गोळी चालवून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांचे गेल्या दोन ते अडिच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून काजल पुण्यात गेल्यापासून तिच्यावर आकाशला संशय येऊ लागला. मूळच्या तुमसर (जि.भंडारा) येथील परंतू सध्या पुण्यात असलेल्या एका युवकाशी काजलची मैत्री आकाशला आवडली नाही. त्यामुळे ती आपल्याला सोडून त्याच्यावर प्रेम करीत असल्याचा त्याला संशय येऊ लागला व त्यातूनच हे कृत्य घडल्याचे तपासात पुढे आले.
पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त केले असून त्यातील माहितीची उकल तज्ज्ञांकडून केली जात आहे. दरम्यान ज्या तरुणावरील संशयातून आकाशने हे कृत्य केले त्या तरुणालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलविले आहे. त्याने आपल्यात आणि काजलमध्ये केवळ निकोप मैत्रीचे संबंध होते, असे पोलिसांना फोनवरून सांगितले. पण प्रत्यक्ष भेटीत आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात वापरलेला देशी कट्टा आकाशकडे कुठून आला याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्याचे फिंगर प्रिंट घेऊन ते परीक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)