लोकमान्य उत्सव पुरस्कारांचे निकाल वांद्यात
By Admin | Updated: April 16, 2017 00:45 IST2017-04-16T00:45:57+5:302017-04-16T00:45:57+5:30
गणेशोत्सव लोकमान्य उत्सव म्हणून साजरा करताना सामजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक देण्याचे राज्य शासनाने ठरविले होते.

लोकमान्य उत्सव पुरस्कारांचे निकाल वांद्यात
मंडळांमध्ये गोंधळ : दोन शासन निर्णयांमुळे जिल्हास्तरावरील पुरस्कार अडले
नरेश रहिले गोंदिया
गणेशोत्सव लोकमान्य उत्सव म्हणून साजरा करताना सामजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिक देण्याचे राज्य शासनाने ठरविले होते. त्यासाठी जिल्ह्यातील ३२ मंडळे जिल्हास्तरावरील स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यापैकी १४ मंडळांना १७ पुरस्कार जाहीर करण्यात आले. जिल्हास्तरीय समितीने पाठविलेल्या यादीनुसार राज्याचे पुरस्कार १ मार्च २०१७ जाहीर झाले. त्यानंतर पुन्हा ११ एप्रिल २०१७ रोजी पुरस्कारप्राप्त गणेशोत्सव मंडळांची नावे जाहीर करण्यात आली. या दोन शासन निर्णयात मंडळांच्या पुरस्कारात तफावत असल्याने गोंदियासह अनेक ठिकाणी जिल्हास्तरावरचे तीन पुरस्कार अडले आहेत.
गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे, समाजात जनजागृती घडवावी यासाठी राज्य शासनाने यावर्षापासून स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाओ, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन या विषयांना घेऊन लोकमान्य उत्सव करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यातील ३२ गणेश मंडळे सहभागी झाली होती. यापैकी १४ गणेश मंडळांना १७ पुरस्कार घोषित केले होते. लोकमान्य उत्सव साजरा करताना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी शासनाने पाच विषय देऊन त्या विषयांवर आकर्षक देखावे तयार करणाऱ्या मंडळांना तालुकास्तरापासून विभागस्तरापर्यंत प्रथम, व्दितीय व तृतीय अशी रोख स्वरूपातील बक्षीसे ठेवली होती. परंतु तीन पुरस्कारासाठी कमीत कमी पाच मंडळे सहभागी व्हायला हवी, अन्यथा तीन पुरस्कार दिले जाणार नाही, असे शासनाने सूचविले होते. एका तालुक्यातून चार मंडळे सहभागी झाल्यास त्या तालुक्याला फक्त दोन, तीन मंडळे सहभागी होणाऱ्या तालुक्याला फक्त एकच पुरस्कार देण्याचे शासनाने ठरविले होते.
जिल्हास्तरीय समितीने तालुका व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी मंडळांची निवड करून तसा अहवाल शासनाला पाठविला. शिक्षण विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यात वक्रतुंड गणेश मंडळ तिरोडा जिल्ह्यात प्रथम, नवयुवक किसान गणेश उत्सव मंडळ देवरी द्वितीय आणि लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पूरगाव ता.गोरेगाव हे तीन मंडळ जिल्हास्तरावर पुरस्कारासाठी पात्र होती.
यासंदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने १ मार्च रोजी काढलेल्या निर्णयात शिक्षण विभागाने पाठविलेल्या मंडळांची नावे बरोबर होती. परंतु पुन्हा पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाने ११ एप्रिल २०१७ रोजी दुसरा शासन निर्णय जाहीर केला. त्यात देवरी येथील नवयुवक किसान गणेश उत्सव मंडळ प्रथम, रामनगर नवयुवक गणेश उत्सव मंडळ रामनगर गोंदिया द्वितीय व वक्रतुंड गणेश मंडळ तिरोडा तृतीय असल्याचे दाखविले. यादीत तफावत असल्याने मंडळांमध्ये गोंधळ झाला. ११ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या यादीत दुसऱ्या क्रमांकाच्या गणेश मंडळाला पहिला पुरस्कार, पहिल्या क्रमाकांच्या मंडळाला तृतीय पुरस्कार दाखविला. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुरगावला डावलून जिल्हास्तरीय यादीत रामनगरचे नाव नसताना त्या मंडळाला तृतीय पुरस्कार दाखविण्यात आला. त्यामुळे गणेश मंडळांमध्ये या पुरस्कारावरून नाराजी व्यक्त होत आहे.
घोळामुळे रिकाम्या हाताने परतले
लोकमान्य उत्सव पुरस्कार म्हणून जिल्हास्तराचा सन्मान घेण्यासाठी गेलेल्या तीन मंडळांना पुरस्काराविना रिकाम्या हाताने परतावे लागले. ११ एप्रिल रोजी गोंदियात आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरीय पुरस्काराला घेऊन बराच गोंधळ उडाला. जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील पुरस्कार वाटप करण्यात आले. परंतु जिल्हास्तरावरील पुरस्काराच्या गोंधळाने हे पुरस्कार वाटप करण्यात आले नाही.
हा घोळ झालाच कसा?
शासनाने लोकमान्य उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पुरस्कार देण्यासाठी तालुकास्तरावर येणाऱ्या मंडळांची प्रवेशिका जिल्हास्तरावर, तेथून प्रथम येणाऱ्या मंडळाची प्रवेशिका विभागीय स्तरावर व विभागीय स्तरावरून प्रथम येणाऱ्या मंडळाची प्रवेशिका राज्यस्तरावर जाणार होती. जिल्हास्तरावरून गेलेल्या यादीत ज्या मंडळाचे नाव नाही किंवा त्यांची प्रवेशिकाही गेली नाही अशा मंडळाचे नाव जिल्हास्तरावर यादीत येणे म्हणजे लोकमान्य उत्सवाला पहिल्याच वर्षी ग्रहण लावण्याचा प्रकार दिसून येत आहे. शासनाने यामधील चूक कुणाची याचा शोध घेऊन ती सुधारावी अशी अपेक्षा मंडळांकडून केली जात आहे.