अनास्थेत ‘लोकमान्य उत्सव’
By Admin | Updated: September 11, 2016 00:18 IST2016-09-11T00:18:45+5:302016-09-11T00:18:45+5:30
गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे, समाजात जनजागृती घडवावी यासाठी राज्य शासनाने यंदापासून स्वदेशी, साक्षरता,

अनास्थेत ‘लोकमान्य उत्सव’
नरेश रहिले गोंदिया
गणेशोत्सवातून मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावे, समाजात जनजागृती घडवावी यासाठी राज्य शासनाने यंदापासून स्वदेशी, साक्षरता, बेटी- बचाव, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन या विषयाला घेऊन लोकमान्य उत्सव साजरा करा असे सूचविले. त्यासाठी तालुका स्तरापासून विभाग स्तरापर्यंत रोख बक्षीस ठेवण्यात आले. परंतु गणेश मंडळांच्या अनास्थेमुळे गोंदिया जिल्ह्यातील २७ पुरस्कारासाठी फक्त २१ मंडळे सहभागी झाले आहेत. सामाजिक उपक्रम सोडून स्वत:च्याच गुंगीत राहणाऱ्या मंडळांनी सामाजिक भान जपण्याची गरज आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते बाळ गंगाधर टिळक यांचे १६० वे जयंती वर्ष सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोकांना एकत्र आणून टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाला महापुरूषांचे महत्व कयावे यासाठी राज्यशासनाने यंदापासून लोकमान्य उत्सव सुरू केला. गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी जनजागृतीच्या दृष्टीने देखावे, सामाजिक कार्य, समाजाचा सहभाग आदि विषयांना घेऊन शासनाने ठरवून दिलेल्या पाच पैकी एका संकल्पनेवर जनजागृती घडवून आणण्याचे काम करायचे होते.
जिल्ह्यात ९६३ ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन केली आहे. परंतु फक्त २१ मंडळे या उपक्रमात सहभागी झाले आहेत. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील प्रत्येकी ४ मंडळ, गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव प्रत्येकी दोन मंडळे तर सालेकसा तालुक्यात ७ मंडळे सहभागी झाले आहेत. आमगाव व देवरी या दोन तालुक्यातील एकही मंडळ सहभागी झाले नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. शासनाने पूर्वी जनजागृती केली नाही, नोंदणी मंडळे सहभागी होऊ शकतात अशी अट ठेवल्यामुळे अनेक मंडळांने या उत्सवाकडे पाठ फिरविली. सामाजिक भान जपण्यासाठी शासनाने आवाहन केले तरी गणेशोत्सव मंडळांनी याकडे लक्ष दिले नाही.