वन विभागाची शस्त्रे कुलूपबंद

By Admin | Updated: February 11, 2015 01:26 IST2015-02-11T01:26:46+5:302015-02-11T01:26:46+5:30

उप वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दारूगोळा व शस्त्रांचे प्रशिक्षण देणे सुरू असल्यामुळे त्यांना देय असणारी शस्त्रे पोलीस मुख्यालय कारंजा येथे कुलूपबंद ठेवण्यात आली आहेत.

Locking the forest department's weapons | वन विभागाची शस्त्रे कुलूपबंद

वन विभागाची शस्त्रे कुलूपबंद

गोंदिया : उप वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दारूगोळा व शस्त्रांचे प्रशिक्षण देणे सुरू असल्यामुळे त्यांना देय असणारी शस्त्रे पोलीस मुख्यालय कारंजा येथे कुलूपबंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक रेंजमधील दोन ते तीन अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू असून आतापर्यंत जवळपास २० ते २५ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
वन विभागाच्या जुन्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे तर सुरू आहेत. पण नवीन भरती झालेल्यांनाही पूर्व तयारी (रिव्ह्यु) म्हणून प्रशिक्षण दिले जात आहे. वन विभागात नवीन भरती झालेले अधिकारी-कर्मचारी शस्त्र चालविणे व दारूगोळा सांभाळण्याचे प्रशिक्षण घेवून येतात. त्यांना पूर्वतयारी म्हणून गोंदियाच्या कारंजा येथील पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण दिले जात आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोणातून कोणताही वन कर्मचारी जंगलात जबाबदारीवर एकटा जाण्यास तयार नाही. वनरक्षकाच्या सोबतीला एकतरी मदतनिस असतोच. मात्र पूर्ण प्रशिक्षीत नसल्यास रायफल किंवा पिस्तूल सोबत घेवून वनात जाणे धोकादायकच व जोखमीचे काम असते. त्यामुळेच सर्वांचे शस्त्र जमा करण्यात आले आहेत.
नक्षलग्रस्त परिक्षेत्रात विनाप्रशिक्षण व शस्त्रांशिवाय जाणे जोखमीचे असते. एका नक्षल भागात पाच-पाच गावे येतात. त्यामुळे आता वन विभागाने आपल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे सुरू केले आहे.
एकाच वेळी सर्वांना प्रशिक्षण देणे शक्य नसल्यामुळे प्रत्येक रेंजमधून दोन ते तीन अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यात आरएफओ, एएफओ व वनपालांचाही समावेश आहे.
वन विभागाच्या राऊंड आॅफिसर्स यांना एसएलआर व पिस्तुलांचे तर आरएफओ यांना पिस्तुलांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या प्रशिक्षणासाठी वन विभागातर्फे नागपूरवरून दारूगोळा मागविण्यात आला आहे.
मात्र त्याची देखभाल, स्वच्छता, मेंटेनन्स आदी कामांसाठी वन विभागाकडे एक्स्पर्ट नसल्यामुळे शस्त्रे-दारूगोळा पोलीस मुख्यालय कारंजा येथे ठेवण्यात आला आहे. पोलीस विभागात असलेल्या एक्स्पर्टमुळे सदर साहित्य सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Locking the forest department's weapons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.