लॉकडाऊन नावालाच; बारमध्ये उशिरापर्यंत झिंगाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:29 IST2021-01-23T04:29:49+5:302021-01-23T04:29:49+5:30
गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून, जिल्ह्यात दारूबंदी नाहीच. दारूबंदीमुळे शासनाचा महसूलही बुडतो. हा महसूल बुडू नये म्हणून ...

लॉकडाऊन नावालाच; बारमध्ये उशिरापर्यंत झिंगाट
गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून, जिल्ह्यात दारूबंदी नाहीच. दारूबंदीमुळे शासनाचा महसूलही बुडतो. हा महसूल बुडू नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात महिना-दीड महिना दारू दुकाने बंद होती व त्यामुळे मोठ्या प्रमाणात शासनाचे नुकसान झाले. त्यानंतर दारू दुकाने सुरू करण्यात आली व त्यांना ठरावीक वेळ देण्यात आला. त्या वेळात त्या दारू दुकानांसमोर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. दारूड्यांच्या सेवेत पोलीस अशी अवस्था महिनाभर राहिली. कोरोनाचा प्रादुर्भाव जसजसा कमी होत गेला तसतशी दारू दुकानांची वेळ वाढविण्यात आली. ही वेळ नेहमीप्रमाणे रात्री १० वाजतापर्यंत करण्यात आली. परंतु आता या दारू दुकानांकडे दुर्लक्ष झाल्याने मध्यरात्रीपर्यंत मद्यपींचा झिंगाट बिअरबार, वाइन शॉपी व देशी दारू दुकानांत दिसून येतो. ही दारू दुकाने, हॉटेल, दुकान प्रतिष्ठान वेळेच्या आत बंद व्हावे, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. परंतु त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मध्यरात्रीपर्यंत वाइन शॉपी, बिअर बार व दारू दुकानेही सुरू असतात. इतकेच नव्हे तर हॉटेलही मध्यरात्री सुरूच असतात. शहर पोलिसांनी अशाच एका हॉटेलातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र शासनाने ३० जानेवारीपर्यंत लाॅकडाऊन वाढविला असला तरी मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्या हॉटेलातील चालक, मालक व इतर अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॉक्स
रेलटोली परिसरातील हॉटेल-१
गोंदिया शहरातील रेलटोली परिसरातील एक हॉटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू होते. त्या हॉटेलात काही ग्राहक तर काही गप्पा मारणारे लोक बसून होते. टीव्हीदेखील सुरूच होती. कोरोनाच्या संसर्गाला घेऊन या हॉटेल चालकामध्ये काहीच भीती दिसून आली नाही.
.............
बाजार परिसरातील हॉटेल-२
कोरोनाचा धोका अजून टळला नाही तरी हॉटेलात मध्यरात्रीपर्यंत सेवा दिली जाते. ग्राहक असोत किंवा नसोत तरीही शहरातील बाजार परिसरातील एक हॉटेलचालक हॉटेल सुरूच ठेवून बसला होता. यादरम्यान कुणी आले तर त्यांना सेवा देण्याची तयारीही हॉटेलमालकाची होती. नोकर सर्व घरी गेले असले तरी हा हॉटेल चालक हॉटेलातच बसून ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसला.
...........
बाजार परिसरातील किराणा दुकान-१
किराणा दुकानदारही आपला व्यापार वाढविण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत ग्राहकांना साहित्य विक्री करताना दिसला. ग्राहक गेल्यानंतर शटर बंद न करता दुसऱ्या दिवशीचे नियोजन कसे करायचे, याचा आढावा तो दुकानात बसून घेत होता. याचदरम्यान आलेल्या एका ग्राहकाला त्याने किराणा सामानही दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला या दुकानात त्याने जुमानले नसल्याचे दिसले.
...................
शहरातील बिअर बार- २
शहरातील बिअर बार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात बारमालकांत रस दिसला. परंतु पोलिसांनी कारवाई करू नये यासाठी आपली रोजंदारीवरील माणसे पोलिसांच्या गस्तीवरील पथकाकडे लक्ष देऊन असतात. रात्री १० वाजेनंतर बिअर बारच्या बाहेरील लाइट बंद करून आतमध्ये मंद प्रकाशात मद्यपी आपला शौक पूर्ण करताना दिसतात. काही बिअर बार वेळेववर बंद होतात; पण काही बिअर बार उशिरापर्यंत सुरूच असतात.
...............
बिअर बार: १२६
वाइन शॉप: ११
.............
असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
.......
कोट
रात्री १० च्या आत सर्व देशी, विदेशी, बिअर बार, दारू दुकाने बंद व्हावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन सर्व व्यावसायिकांनी करावे. नियम तोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नियम सर्वांनी पाळावेत.
-प्रवीण तांबे
अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गोंदिया