सुभाष बागेत खेळणार्‍या चिमुकल्यांचा जीव धोक्यात

By Admin | Updated: May 22, 2014 23:59 IST2014-05-22T23:59:12+5:302014-05-22T23:59:12+5:30

उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असल्याने येथील सुभाष बाग सध्या बालगोपालांच्या गर्दीने भरगच्च आहे. मात्र बागेत खेळण्यासाठी येणार्‍या या चिमुकल्यांचा जीव धोक्यात दिसून येत आहे.

The lives of the youngsters in Subhash garden are in danger | सुभाष बागेत खेळणार्‍या चिमुकल्यांचा जीव धोक्यात

सुभाष बागेत खेळणार्‍या चिमुकल्यांचा जीव धोक्यात

 गोंदिया : उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असल्याने येथील सुभाष बाग सध्या बालगोपालांच्या गर्दीने भरगच्च आहे. मात्र बागेत खेळण्यासाठी येणार्‍या या चिमुकल्यांचा जीव धोक्यात दिसून येत आहे. या बागेतील हायमास्ट लाईटचे स्वीच बॉक्स उघडेच पडले आहेत. या हायमास्ट लाईटच्या आजूबाजूला चिमुकले खेळत असतात. अशात एखादा अपघात घडून कुणाच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीकडे मात्र बगिचा प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे. आजच्या परिस्थितीत सर्वच लोक आपल्या आरोग्य सांभाळण्याच्या बाबतीत जागरूक झाल्याचे दिसून येते. यामुळेच तरूणांपासून ते वयोवृद्ध नागरिक सकाळी, सायंकाळी बागेत फिरण्यास येतात. शिवाय सध्या उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असल्याने बच्चे कंपनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बागेत खेळण्यासाठी गर्दी करीत आहे. शहरात चिमुकल्यांना खेळण्यासाठी दुसरी बाग नसल्याने शहरातल्या प्रत्येक भागातून बालगोपाल आपल्या मित्रांसह बागेत खेळण्यासाठी येत आहेत. रात्रीच्या वेळी बागेत अंधार पसरत असल्याने येथे प्रकाश रहावा या दृष्टीने हायमास्ट लाईट लावण्यात आले आहे. न्यायालयाच्या बाजुने असलेल्या बागेतील मोकळ्या जागेत एक हायमास्ट टॉवर मोकळ््या जागेत मधोमध लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या हायमास्ट लाईटच्या उजेडात बच्चे कंपनी पकडा-पकडी व क्रिकेट खेळताना दिसतात. लाईटच्या उजेडात चिमुकल्यांना आनंद येत असून येथेच जास्त गर्दी असल्याचे रोजच दिसून येते. मात्र त्यांचे येथे खेळणेच त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असल्याचे पहायला मिळते. त्या परिसरात प्रकाश रहावा या दृष्टीने लावण्यात आलेल्या हायमास्ट लाईटचे स्वीच बॉक्स उंचावर न लावता खाली जमिनीवरच बसविण्यात आले आहे. बागेतील कर्मचार्‍यांनी आपल्या सुविधेच्या दृष्टीने बॉक्स खाली ठेवले असेल. मात्र हे स्वीच बॉक्स उघडेच असल्याचे बघावयास मिळाले. हायमास्ट लाईटच्या अवती-भोवती हे बालगोपाल खेळत असताना चुकून एखाद्याचा या बॉक्समधील तारांना स्पर्श होऊन काही अप्रिय घटना घडू शकते. मात्र या गंभीर बाबीकडे बागिचा प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते. अशात आपल्या सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी बागेत खेळावयास जाणार्‍या चिमुकल्यांचा जीव मात्र धोक्यात पडू शकतो. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The lives of the youngsters in Subhash garden are in danger