कंत्राटदाराकडून होतेय लाखोंची वीज चोरी
By Admin | Updated: May 9, 2015 01:32 IST2015-05-09T01:32:38+5:302015-05-09T01:32:38+5:30
जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत गावात नळ योजनेचे काम सुरु असून यात कंत्राटदार डायरेक्ट हुक लावून वीज चोरी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कंत्राटदाराकडून होतेय लाखोंची वीज चोरी
काचेवानी : जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत गावात नळ योजनेचे काम सुरु असून यात कंत्राटदार डायरेक्ट हुक लावून वीज चोरी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी व सहायक अभियंत्यांना माहिती देण्यात आली. मात्र यावर त्यांनी वीज चोरी पकडण््याचे अधिकार आमच्याकडे नसल्याचे सांगत हात झटकले.
गरीबाने वीज चोरी केल्यास लाईनमन पासून अधिकाऱ्यांची त्याकडे नजर असते. मात्र धनाढ्य व्यक्ती कितीही चोरी करीत असेल तरी त्यांच्याकडे लक्ष असूनही दुर्लक्ष केले जाते. अशीच स्थिती मजीतपूर, डोंगरगाव, एकोडी, काचेवानी आणि गंगाझरी येथे पहायला मिळाली.
या गावांत जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत नळ योजनेच्या पाईपलाईन करीता लोखंड कापण्याची मशिन (कटर) चालवणे, साचलेले पाणी काढण्याकरीता मोटारचा उपयोग करणे, नळ फिटिंग करीता मशिन द्वारे जमिनीचे खोदकाम करणे अशा विविध कामे सुरू असून यासाठी खांबावर हूक लावून कंत्राटदाराद्वारे विज चोरी केली जात आहे.
सुरू असलेल्या या प्रकाराबाबत उपकार्यकारी अभियंता व सहायक अभियंता गंगाझरी यांना माहिती देण्यात आली. मात्र चोरी प्रकरण पकडण्याचे अधिकार आपल्याकडे नसून स्वतंत्र यंत्रणा भरारी पथक आहे. त्यांना माहिती देण्यात यावी, असे बेजबाबदारपणाचे उत्तरे देण्यात आल्याचे नागरिकांनी लोकमतला सांगितले.
पंथरा दिवस लोटले परंतू कोणत्याही अधिकाऱ्यांनी वास्तविकता पाहण्याचा प्रयत्न केलेला नाही. विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चोरीला प्रोत्साहन दिल्याचे यावरुन स्पष्ट दिसून येत आहे. (वार्ताहर)