‘नेट’मुळे लागणार लाखोंचा चुना

By Admin | Updated: May 10, 2015 00:01 IST2015-05-10T00:01:09+5:302015-05-10T00:01:09+5:30

गतवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय पात्रता, अर्थात नेट परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत जाहीर ....

Likes to choose millions of 'net' | ‘नेट’मुळे लागणार लाखोंचा चुना

‘नेट’मुळे लागणार लाखोंचा चुना

मागील परीक्षेचा निकाल गुलदस्त्यात : पुढील परीक्षेची अधिसूचना जारी
गोंदिया : गतवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय पात्रता, अर्थात नेट परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेचा निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही. त्यातच पुन्हा जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या १५ मेपर्यंत आहे. मागील परीक्षेचा निकाल अद्याप लागलेला नाही. या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची खात्री असणाऱ्यांनाही यामुळे नव्याने अर्ज भरून शुल्क भरावे लागत आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून वसुलीच केली जात आहे. ‘यूजीसी’प्रमाणेच ‘सीबीएसई’देखील निकाल जाहीर करण्यात दिरंगाई करीत असल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
देशपातळीवर नेट परीक्षा घेतली जाते. गत परीक्षेपासून ‘सीबीएसई’ ही परीक्षा घेत आहे. त्यामुळे पॅटर्नही बदलण्यात आला आहे. ‘सीबीएसई’कडून विद्यार्थ्यांना वेळेत निकाल जाहीर होण्याची आशा होती, परंतु त्यांच्याकडूनही ‘यूजीसी’सारखीच दिरंगाई होत आहे. गतवर्षातील डिसेंबर महिन्यात नेट परीक्षा झालेली आहे. तिचा निकाल अद्यापपर्यंत घोषित झाला नाही.
अनेक विद्यार्थ्यांचे पेपर चांगले गेले आहेत. त्यामुळे उत्तीर्ण होण्याची त्यांना पूर्ण खात्री आहे, त्यातच जूनमध्ये होणाऱ्या नेट परीक्षेचे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अगोदरच्या परीक्षेतील निकाल पेपर चांगला जाऊनही निकाल कळू शकला नाही. त्यामुळे पैशाची चिंता न करता नुकसान नको म्हणून विद्यार्थी पुन्हा अर्ज करण्यासाठी गर्दी करीत आहे.
‘यूजीसी’कडून निकाल जाहीर करण्यात नेहमीच दिरंगाई होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना कायम त्याचा फटका बसत होता. परीक्षेचा निकाल आल्यानंतर पुन्हा नव्याने परीक्षा देण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे विद्यार्थी दुसऱ्या अभ्यासाक डे वळतात; परंतु गत परीक्षेचा निकालच न आल्याने ते कचाट्यात सापडले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

शुल्कातही वाढ
यंदा नेट परीक्षेच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४५० शुल्क होते. ते आता ६०० रुपये करण्यात आले आहे. ‘ओबीसी’चे शुल्क २२५ वरून ३०० रुपये, तर अनुसूचित जाती-जमातीचे शुल्क ११० वरून १५० रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. गेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न केल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना हा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Web Title: Likes to choose millions of 'net'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.