आदिवासींच्या घरात पोहोचला सौरऊर्जेचा प्रकाश

By Admin | Updated: June 19, 2014 23:54 IST2014-06-19T23:54:30+5:302014-06-19T23:54:30+5:30

महाराष्ट्राच्या अतिपूर्वेस वसलेला गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त, वनसंपदेने परिपूर्ण परंतु शैक्षणिक विकासाच्या वाटेपासून दुरावलेला आहे. येथे वास्तव्यास असणारा आदिवासी समाज असंख्य समस्यांनी ग्रासलेला

The light of the solar energy reached the tribal's house | आदिवासींच्या घरात पोहोचला सौरऊर्जेचा प्रकाश

आदिवासींच्या घरात पोहोचला सौरऊर्जेचा प्रकाश

गोंदिया : महाराष्ट्राच्या अतिपूर्वेस वसलेला गोंदिया जिल्हा जंगलव्याप्त, वनसंपदेने परिपूर्ण परंतु शैक्षणिक विकासाच्या वाटेपासून दुरावलेला आहे. येथे वास्तव्यास असणारा आदिवासी समाज असंख्य समस्यांनी ग्रासलेला असून शैक्षणिक विकास न झाल्यामुळे हा आदिवासी समाज नेहमीच दुर्लक्षीत राहिला आहे. आदिवासींच्या सर्वांगिण विकासाकरिता शासन स्तरावरही बऱ्याच विकासात्मक योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांनी घेणे सुरू केले आहे. परंतु त्यांच्या समस्या अद्यापही पूर्णपणे सुटलेल्या नाहीत.
समाजाच्या मुख्य प्रवाह व सर्वांगिण विकासापासून दूर असलेला आदिवासी समाज आपले जीवन अंधारात जगत आहे. बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव व बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या घरात अद्याप वीज पोहोचली नाही. विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक योजनांपैकी एक म्हणजे जिल्हा परिषदेच्या बालकल्याण विभागाकडून सौर कंदीलाचे वाटप कार्यक्रम होय.
व्यवसाय व शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे व घरात नेहमीच दारिद्र्याची परिस्थिती असल्यामुळे पाच वर्षापूर्वी जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्युत बिलाचा भरणा करु शकले नाही. त्यामुळे त्यांच्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तेव्हापासून त्या कुटुंबियांच्या घरात अंधार पसरलेला होता.
आदिवासींची ही व्यथा शासनाने सौरऊर्जेेवर चालणारे सौर कंदीलाचे वाटप करून सोडविली. जिल्ह्यातील ३२४ कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार ६७५ रुपये किंमतीचे सौर कंदील वाटप करण्यात आले.
याकरिता आठ लाख ६६ हजार ७०० रुपयांचा निधी मंजूर झाला. यात गोंदिया तालुक्यातील ४३, तिरोडा ४४, आमगाव ५९, गोरेगाव ५२, सालेकसा २९, सडक/अर्जुनी २६, अर्जुनी/मोरगाव ३५, देवरी ३६ अशा एकूण ३२४ कुटुंबियांना सौरकंदीलाचे वाटप करण्यात आले.
घरात विजेची सोय नसल्यामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांपुढे अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत होते. परंतु आता सौर कंदीलाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवा आधार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The light of the solar energy reached the tribal's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.