सहा महिन्यांत लिफ्ट एस्कलेटर लागणार
By Admin | Updated: June 5, 2015 01:52 IST2015-06-05T01:52:50+5:302015-06-05T01:52:50+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकाला ज्या सुविधांची गरज होती व अनेक वर्षांपासून ज्या अत्याधुनिक यंत्रांची मागणी होती, ती आता पूर्ण होत आहे.

सहा महिन्यांत लिफ्ट एस्कलेटर लागणार
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकाला ज्या सुविधांची गरज होती व अनेक वर्षांपासून ज्या अत्याधुनिक यंत्रांची मागणी होती, ती आता पूर्ण होत आहे. येथील होम प्लॅटफार्मवर लिफ्ट, एस्कलेटर व शेड बांधकामाचा शुभारंभ गुरूवारी (दि.४) सकाळी ११.३० वाजता खा. नाना पटोले यांच्या हस्ते नागपूर रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक आलोक कंसल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सहा महिन्यात ही कामे पूर्ण होतील, असे यावेळी सांगण्यात आले.
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफार्मवर शेडचे बांधकाम करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातून प्लॅटफार्मवर जाण्यासाठी रेल्वे पुलापर्यंत पोहोचताना पावसाळ्यात प्रवाशी ओलेचिंब होतात, तर उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होतो. मात्र या शेडचे बांधकाम पूर्ण झाल्यास प्रवाशांची या समस्यांपासून सुटका होणार आहे.
याप्रसंगी खा.पटोले यांच्या हस्ते एस्कलेटर (स्वयंचलित पायऱ्या) व लिफ्टच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आलोक कंसल यांनी सांगितले की, शेड बांधकामासाठी १.९९५ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. प्लॅटफार्म-१ वर हे शेड लागणार आहे, तर एस्कलेटरसाठी १.३४ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. प्लॅटफार्म- १ व २ वर ते लावण्यात येणार आहे. लिफ्ट प्लॅटफार्म-१ वर लागणार असून त्यासाठी ९७ लाख रूपयांचा खर्च येणार आहे. लिफ्ट व एस्कलेटरमुळे अपंग व वृद्धांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर ये-जा करण्याची सुविधा होणार आहे. गोंदिया स्थानकावर अनेक दिवसांपासून असलेल्या या मागणीची आता पूर्तता होत आहे. (प्रतिनिधी)
हिवाळ्यात वैनगंगा महोत्सव
खा.नाना पटोले यांनी सांगितले की, नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांसाठी वैनगंगा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात एका सभेचे आयोजन करण्यात येईल. यात रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. सदर महोत्सव केवळ मनोरंजनासाठी होणार नसून त्यात कला व संस्कृती तसेच सामान्य लोकांना त्यांच्या पारंपरिक व्यवसायाशी जोडण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेण्यात येईल. सदर कार्यक्रम गावागावापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हिरडामाली येथे बनणार नवीन माल गोदाम
गोंदिया येथील माल गोदामाचे स्थानांतरण काचेवानी किंवा हिरडामाली येथे करण्याचे प्रयत्न मागील अनेक वर्षांपासून सुरू आहेत. याबाबत विभागीय महाव्यवस्थापक कंसल म्हणाले, गोंदियातून केवळ दोन रॅक जातात. मात्र ११ रॅक गोंदियात येतात. गोंदियात रॅक वाढल्या तर रेल्वेला लाभ होईल. हिरडामाली येथे माल गोदाम बनविण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. परंतु विरोध असल्यामुळे काम रखडले आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे एक प्रस्ताव बनवून पाठवायचा आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच काहीतरी केले जावू शकेल. नागपूरवरून येणाऱ्या रेल्वेगाड्या प्लॅटफॉर्म-१ वर आणण्याचे प्रयत्न भविष्यात करण्यात येईल, असेही कंसल म्हणाले.