पावसामुळे जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: September 12, 2016 00:20 IST2016-09-12T00:20:30+5:302016-09-12T00:20:30+5:30
जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत
नदी-नाल्यांना पूर: अनेक घरात घुसले पाणी; जिल्ह्यातील १० रस्ते झाले बंद
गोंदिया : जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विष्कळीत झाले. सालेकसा तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा तालुका मुख्यालयापासून संपर्क तुटला. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील घरात पाणी शिरल्याने घरवाल्यांना त्रास सहन करावा लागला.
गोंदिया जिल्ह्यात १० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरूवात झाली. पहाटेपासून पावसाने चांगलेच झोडपले. सतत १० वाजता पर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे गणपती पूजा आरतीला लोक जाऊ शकले नाही. अनेक गणेश मंडपात पाणी साचले.
सालेकसा तालुका प्रतिनिधी व दरेकसा वार्ताहर यांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकसा परिसरात सकाळी ५ ते ७ वाजता दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला. वाघनदी तुडूंब भरून वाहत होती. नाल्यांना पूर आला. परिणामी सकाळी ८.३० ते ९ वाजता दरम्यान या मार्गावरून जाणारी राजधानी एक्सप्रेस अडीच तास दरेकसा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. पाणी कमी झाल्यावर त्या गाडीला रवाना करण्यात आले. रात्रीपासून पाऊस सुरूच होता. पावसामुळे धनेगाव नदी, चांदसूरज, हाजराफॉल धबधबा ओसंडून वाहत आहे. त्यामुळे दुपारी १ वाजता पर्यंत सालेकसा ते दरेकसा मार्ग बंद होता.
अर्जुुनी मोरगावात १० सप्टेंबरच्या सायंकाळी ७.१५ वाजता दरम्यान पावसाला सुरूवात झाली. रात्रभर हळू पाऊस सुरू होता. रविवारच्या सकाळी ९ वाजता पर्यनत या परिसरात पाऊस सुरू होता. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना समाधान झाले. आताही ढगाळ वातावरण आहे. आमगाव तालुक्याच्या बोरकन्हार येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने पंचायत समिती सदस्याने यासंदर्भात नायब तहसीलदार यांना याची माहिती दिली. (जिल्ह्यातील वार्ताहर व तालुका प्रतिनिधींकडून)
सालेकसा-देवरीत अतिवृष्टी
जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी २६ मी.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. सालेकसा व देवरी तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. देवरीत 65 मी.मी. व सालेकसात 67 मी.मी. पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. गोंदिया तालुक्यात ४.४, गोरेगाव ५.१, तिरोडा २२.२, अर्जुनी-मोरगाव ३९ मी.मी., आमगाव १४.२ व सडक-अर्जुनी तालुक्यात १७.७ मी.मी. सरासरी पाऊस पडला.
जैन कुटुंब बालबाल बचावले
बोरी (नवाटोला) नाल्याच्या पूलावरून पाणी यात होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन चालकाला पूलावर पाणी किती आहे याचा अंदाज नसल्याने त्याने पाण्यात वाहन टाकले. परिणामी पाण्यात कार अडकली. कार मध्ये २ महिला, २ पुरूष व एक बालक बसलेला होता. मध्यप्रदेशच्या बालाघाट येथील जैन कुटुंब आपल्या कुळदेवतेच्या दर्शनसाठी बैरागड येथे जात होते. जैन कुटुंब सुरक्षीत आहेत.