तीन आरोपींना जन्मठेप
By Admin | Updated: March 17, 2016 02:24 IST2016-03-17T02:24:56+5:302016-03-17T02:24:56+5:30
शहरात जमिनीची दलाली करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मामा चौकातील राहुल धनराज खोब्रागडे (३३) याचा दोन वर्षापूर्वी पैशाच्या वादातून तिघांनी खून केला होता.

तीन आरोपींना जन्मठेप
जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : राहुलचा खून करून मृतदेह जंगलात फेकला
गोंदिया : शहरात जमिनीची दलाली करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या मामा चौकातील राहुल धनराज खोब्रागडे (३३) याचा दोन वर्षापूर्वी पैशाच्या वादातून तिघांनी खून केला होता. ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून मृतदेह पोत्यात बांधून जंगलात फेकला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, गोंदियाच्या मामा चौकातील राहूल धनराज खोब्रागडे हा ६ जुलै २०१४ च्या सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. शहराच्या एनएमडी कॉलेजजवळील एका दुकानासमोर त्याची मोटरसायकल (एमएच ३५/व्ही-८८१६) आढळली. राहुल खोब्रागडे सावकारी करीत होता. त्याने दोन लाख रूपये प्रमोद रामाजी कापगते (२४) रा. गांधी वॉर्ड गोंदिया याला कर्ज म्हणून देताना त्याला दिलेल्या रकमेतून व्याज कापून घेतले. या पैशाच्या कारणावरून प्रमोद कापगते व राहुल खोब्रागडे यांच्यात बाचाबाची व्हायची.
४ जुलै रोजी प्रमोद व राहुल यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी राहुलने प्रमोद कापगतेला मारहाण केली. त्यानंतर ५ जुलै रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाली. सायंकाळी प्रमोद कापगते याने मनोहर चौक गोंदिया येथील करण राधेश्याम अग्रवाल (२६) याच्या दुकानात बसून राहुल खोब्रागडेचा काटा कसा काढायचा याचे नियोजन केले. ६ जुलै रोजी दुपारी नमाद महाविद्यालयासमोर राहुलला बोलावून पैसे सायंकाळी देतो असे त्याला सांगण्यात आले.
सायंकाळी इंडिका कार (एमएच ३५/४०७१) मध्ये प्रमोद कापगते, श्रीनगराच्या चंद्रशेखर वॉर्डातील हरिश टिकाराम पराते (२४) व करण राधेश्याम अग्रवाल (२६) हे तिघेही एनएमडी कॉलेजसमोर आले. तेथील क्वाईन बॉक्सवरून राहुलला फोन करून बोलावले. तेथे राहूल आल्यावर त्याला २० हजार रूपये कमी आहेत, ते २० हजार रूपये गंगाझरी येथून आणू असे सांगून त्याला गंगाझरीला नेण्याच्या नावावर इंडिकात बसवले. मुंडीपार एमआयडीची परिसर येताच त्या गाडीत बसलेल्या हरीश परातेने संडास लागल्याचे सांगून वाहन थांबविले. यावेळी सगळे गाडीबाहेर आले व पायात लपवून ठेवलेल्या चाकूने मारून राहुलचा खून केला.
यावेळी कारच्या चालकाचा मोबाईल बंद करण्यात आला. त्यानंतर कारने ते तिरोडा येथे गेले. तिरोडा येथील बेलानी यांच्या दुकानातून कपडे खरेदी करून खुनाने माखलेले कपडे बदलण्यात आले. त्यानंतर ते बोदलकसा जंगलाकडे गेले. राहूलला पोत्यात भरून जंगलात फेकण्यात आले.
रक्ताने माखलेले राहूलचे बूटही बोदलकसा जंगलात फेकण्यात आले. पुन्हा गोंदियाकडे येताना बाजपेयी वॉर्डात त्यांनी हरिष परातेला सोडले.
या प्रकरणाचा तपास तिरोडाचे उपविभागीय अधिकारी दीपक गिऱ्हे व पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी दिनेश पालांदूरकर व सहायक फौजदार कऱ्हाडे यांनी काम पाहिले. (तालुका प्रतिनिधी)
खुनानंतर तीन नगरसेवकांना फोन
राहुलचा खून केल्यानंतर गोंदियात परतलेल्या आरोपींनी गोंदियाच्या मोठ्या बसस्थानकावरून राहुलच्या मोबाईलने गोंदियातील तीन नगरसेवकांच्या मोबाईलवर फोन केला. त्यानंतर आरोपींनी राहूलचा मोबाईल उड्डाण पुलाखालील नालीत फेकून दिला, अशी माहिती तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.
गोंदियातील त्या तीन नगरसेवकांना मृतक राहुलच्या फोनवरून फोन करण्यामागे पोलिसांची दिशाभूल करणे हा उद्देश होता. तिघांना फोन केल्यानंतर आणि नंतर मोबाईल नालीत फेकल्यानंतर आरोपी जयस्तंभ चौकात आले. त्यांनी वाहनाचे भाडे दोन हजार रूपये वाहन चालकाला देऊन आईसक्रीम खाल्ले व त्यानंतर आपापल्या घरी निघून गेले.
अशी सुनावली शिक्षा
कलम ३०२ अंतर्गत तिघांना जन्मठेप व प्रत्येक आरोपीला १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ वर्षाची शिक्षा, कलम २०१ अंतर्गत ३ वर्षाची शिक्षा, प्रत्येक आरोपीला ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा सुनावली.
दंडाच्या रकमेतील ५० टक्के रक्कम मृताच्या पत्नीला देण्याचे आदेश जिल्हा व सत्र प्रमुख न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी दिले आहे. सरकारी वकील म्हणून महेश होतचंदानी यांनी काम पाहिले.