उपसरपंचाच्या खुनातील आरोपीला जन्मठेप

By Admin | Updated: September 16, 2015 02:26 IST2015-09-16T02:26:51+5:302015-09-16T02:26:51+5:30

कटंगीकला येथील माजी उपसरपंच व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अजित प्रभुदयाल सिंग (५०) यांचा ...

Life imprisonment for the killer of the sub-district | उपसरपंचाच्या खुनातील आरोपीला जन्मठेप

उपसरपंचाच्या खुनातील आरोपीला जन्मठेप

गोंदिया : कटंगीकला येथील माजी उपसरपंच व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अजित प्रभुदयाल सिंग (५०) यांचा ९ एप्रिल २०१३ च्या दुपारी १२ वाजता गावातील स्मशानघाटात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या गावातीलच ब्रिजलाल फत्तेसिंग बनोटे (३५) या मारेकऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
गावातील चैतराम नांदने या इसमाच्या अंत्यसंस्कारासाठी अजितसिंग कटंगीटोला येथील फुटका तलावावरील स्मशानभूमीत गेले होते. यावेळी गावातील फत्तेसिंग बनोटे हा तिथे कुऱ्हाड घेऊन आला व डोक्याच्या मागील भागावर त्याने कुऱ्हाडीने वार केले. यात गंभीर जखमी होऊन अजितसिंग कोसळले. उपस्थित गावकऱ्यांनी त्यांना लगेच उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. परंतू काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
मजुरीचे पैसे अजितसिंगने न दिल्यामुळे ब्रिजलालने त्यांचा खून केला होता. प्रदीप प्रभुदयाल सिंग (५७) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला होता.
या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हासत्र न्यायाधिश एम.जी. गीरटकर यांनी सुनावणी केली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विणा बाजपेयी यांनी काम पाहिले. या प्रकरणातील आरोपी ब्रिजलाल बनोटेला जन्मठेप व एक हजार रूपये दंड ठोठावला आहे. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे महेश महाले, सहाय्यक फौजदार राजकुमार कराडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Life imprisonment for the killer of the sub-district