रेल्वेप्रमाणे अधिकारीही लेट
By Admin | Updated: January 2, 2017 00:44 IST2017-01-02T00:44:29+5:302017-01-02T00:44:29+5:30
आमगाव रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यासाठी येणारे रेल्वे महाप्रबंधक रेल्वे सेवेप्रमाणे स्वत:ही एक तास उशिरा पोहचले.

रेल्वेप्रमाणे अधिकारीही लेट
आमगाव : आमगाव रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यासाठी येणारे रेल्वे महाप्रबंधक रेल्वे सेवेप्रमाणे स्वत:ही एक तास उशिरा पोहचले. तर रेल्वेचे निरीक्षण करताना त्यांनी ट्रॅकवरच निरीक्षण करू परतीचा मार्ग धरला. अधिकारी उशिरा येऊन एक तास प्रतिक्षेत असलेल्या आमदारांना थांबा दिल्याने आमदारांनी महाप्रबंधकांची कान उघाडणी केली.
आमगाव रेल्वे स्थानकांचे निरीक्षण करण्यासाठी महाप्रबंधक सत्येंद्रकुमार आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह स्थानकात आले. दिलेल्या वेळेच्या एक तास उशिरा आलेल्या महाप्रबंधकांनी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना महत्व न देता अगोदर जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पुढील एक तासानंतर रेल्वे ट्रॅकवर तपासणी करून निरीक्षण पूर्ण केल्याचा देखावा केला. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाबत समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. आमगाव, सालेकसा, धानोली या रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांचे निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांना महाप्रबंधकांनी स्वत: आलेल्या रेल्वे कोचजवळ बोलावून समस्यांचे निवेदन स्विकारले.
यावेळी रेल्वे समितीचे सदस्य जगदिश शर्मा, यशवंत मानकर, कमलेश चुटे, नरेंद्र बाजपेई, चंपालाल भुतडा, पुरूषोत्तम सोमवंशी, राजीव मोदी, विनय अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, बाळु भुजाडे, मनोज सोमवंशी, क्रिष्णा चुटे, राकेश शेंडे, रुपकुमार शेंडे, प्रदीप बिसेन, उत्तम नंदेश्वर यांनी रेल्वेतील विविध समस्यांचे निवेदन रेल्वे महाप्रबंधक सत्येंद्रकुमार यांना देऊन मागणी पूर्ण करण्याची विनंती केली. यावेळी आमदार संजय पुराम यांनी बाम्हणी, धानोली रेल्वे क्रॉसींग मार्गावरून जाणारा रस्ता नागरिकांना आवागमनसाठी सोईचा व्हावा यासाठी
त्या मार्गाच्या बांधणी करीता रेल्वे विभागाला सुचना करून निर्णय घेण्यासाठी पत्र सोपविले. आमगाव, सालेकसा व डोंगरगड रेल्वे मार्गावर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान प्रवाशांना प्रवासी वाहतुकीसाठी लोकल गाडी सुरू करण्याची मागणी नागरिक प्रतिनिधी मंडळाने महाप्रबंधकांना लेखी पत्राद्वारे केली.
आमगाव रेल्वे स्थानकात आलेले रेल्वे महाप्रबंधक सत्येंद्रकुमार यांनी आमदार पुरामसह नागरिक प्रवासी प्रतिनिधी मंडळाचे रेल्वे फलाटावरूनच निवेदन स्विकारून परतीचा मार्ग घेतला. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी)
रेल्वेच्या समस्यांवर समाधान नाही
आमगाव रेल्वे स्थानकासह सालेकसा, गुदमा, धानोली या रेल्वे स्थानकावर असलेल्या समस्या, आमगाव व गोंदिया मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल, धानोली, बाम्हणी पायवट रस्ता निर्माण, दुपारपाळीतील प्रवाशांकरीता लोकल गाडी चालविण्याच्या मागणीकडे रेल्वे विभागाने गंभीरतेने घेतले नाही. अनेक वर्षापासून महत्वाच्या मागण्यांकडे निर्णय होत नसल्याने या समस्यांवर समाधान दिसून येत नाही.
रेल्वे रुळ ओलांडून महाप्रबंधकांची भेट
आमगाव रेल्वे स्थानकात निरीक्षणासाठी आलेले महाप्रबंधक सत्येंद्रकुमार यांनी रेल्वे समिती, आमदार, नागरिक प्रवासी प्रतिनिधी यांना रेल्वे फलाटावर बोलावले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे पुलाचा सल्ला न देता रेल्वे रुळ ओलांडून येण्याची सुचना केली. त्यामुळे महाप्रबंधकाच्या भेटीसाठी त्यांच्याच नजरेसमोरुन आमदारांसह नागरिक प्रतिनिधीमंडळाने रेल्वे रूळ ओलांडून महाप्रबंधकाची भेट घेतली. परंतु याप्रसंगी सुरक्षेलाही छेद लावण्यात आले.