जि.प.च्या विद्यार्थ्यांना देणार संस्कारांचे धडे
By Admin | Updated: April 18, 2017 01:09 IST2017-04-18T01:09:53+5:302017-04-18T01:09:53+5:30
उन्हाळी सुट्यांमध्ये बालकांसाठी ‘समर कॅम्प’ घेऊन त्या माध्यमातून विविध प्रकारचे कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

जि.प.च्या विद्यार्थ्यांना देणार संस्कारांचे धडे
उन्हाळी सुट्या : विविध खेळांसह कलाकौशल्यांचे देणार प्रशिक्षण
गोंदिया : उन्हाळी सुट्यांमध्ये बालकांसाठी ‘समर कॅम्प’ घेऊन त्या माध्यमातून विविध प्रकारचे कौशल्य विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर अनेक विद्यार्थी रिकामे भटकत असतात. त्यामुळे त्या बालकांचे नुकसान होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य करण्यासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदा गोंदियात ‘संस्कार शिबिरां’चे आयोजन केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी वाचन कुटीनंतर आता उन्हाळी शिबिराचे आयोजन करणारा गोंदिया पहिलाच जिल्हा आहे. जिल्ह्यातील १०६९ शाळांमधील ९९ हजार ११४ विद्यार्थ्यांना या शिबिरात सहभागी करण्याचा मानस आहे.
मागील वर्षी जि.प. शाळांत उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ते शिबिर यशस्वी झाले होते. अंजिता मेंढे यांनी आपल्या शाळेत काही दिवस निवासी शाळेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांकडून हस्ताक्षर सुधार कार्यक्रम, विश्वजीत मंडळाने ‘पेपर मॅजिक वर्क’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्य विकसित केले. यावर्र्षी ‘संस्कार शिबिर’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. शिबिरमध्ये शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १४ एप्रिलपासून ९ मेपर्यंत सकाळी ७.३० ते ९.३० वाजतादरम्यान या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘संस्कार शिबिरां’ मध्ये बालकांना सामाजिक दायीत्वाची ओळख करून दिली जाणार आहे. पाण्याची बचत, इंधन बचत, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची माहिती दिली जाणार आहे. बालकांना उन्हापासून बचावासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जाणार आहे.(तालुका प्रतिनिधी)
घरी मिळणार पुस्तके
वाचन कौशल्याअंतर्गत शाळास्तरावर असलेल्या गं्रथालयात द्विभाषिक, भाषा, महापुरुषांच्या जीवनावर आधारित बाल साहित्य ही पुस्तके वाचनासाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र दिले आहे.
योगापासून डिस्कव्हरी चॅनलपर्यंतचा प्रवास
बालकांना शारीरिक दृष्टीने सुदृढ करण्यासाठी व निरोगी ठेवण्यासाठी ‘संस्कार शिबिरां’मध्ये योगासन शिकविण्यात येणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुलांना कसल्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी बैठकीच्या खेळासाठी कॅरम, बुध्दीबळ या खेळांचा समावेश आहे. बालकांमधील कलाकौशल्याला चालना देण्यासाठी शिल्पकारी, मूर्ती तयार करणे, सुतार काम, चित्रकला, संगीत, साहित्य, वादन, कागदापासून विविध वस्तू तयार करणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, पेपर वर्क, क्ले आर्ट, स्वीमिंग शिकविले जाणार आहे.
ज्या शाळा डिजीटल झाल्या त्या ठिकाणी ज्ञानवर्धक चित्रपट दाखविले जाणार आहे. यात डिस्कवरी चॅनल, समुद्र, आकाश, चंद्र, सूर्य, जगातील नद्या, रेगिस्तान, अभयारण व जंगलाचा समावेश राहील. बालकांत संवाद कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने औपचारिक-अनौपचारिक संवाद, अज्ञात व्यक्तीसोबत आपल्या आवडीच्या विषयावर चर्चा, वाचन केलेल्या पुस्तकाचे वर्णन,चित्रपटाची समीक्षा यापासून संवाद कौशल्य विकसित केले जाणार आहे. पारंपरिक व शास्त्रीय नृत्य शिकविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अविकसित बालकांसाठी अतिरिक्त वर्ग उघडून त्यांना विकसीत केले जाणार आहे.