कमी वीज दाबाने केला घात

By Admin | Updated: April 12, 2017 01:17 IST2017-04-12T01:17:08+5:302017-04-12T01:17:08+5:30

शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे.

Less power pressing done | कमी वीज दाबाने केला घात

कमी वीज दाबाने केला घात

शेतातील पीक करपले : शेतकऱ्यांचे अश्रू कुणीच पुसेना
अर्जुनी मोरगाव : शेतकऱ्यांचे पुढारी आम्हीच म्हणणारे राजकीय नेते दिसेनासे झाले आहेत. १५ ते २० दिवसांपासून विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपत आहे. पण ही बाब लक्षात न घेता वीज वितरण कंपनी सुध्दा डोळेझाक करीत असून अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्यावर कोणाचे ही वचप दिसून येत नाही. वीजेच्या या समस्येमुळे मात्र आपले करपत असलेले पीक बघून शेतकऱ्यांच्या डोळ््यात अश्रू येत आहेत.
परिसरातील शेतशिवाराची झळा परिस्थिती खूप गंभीर आहे. विजेचा लंपडाव व कमी दाब निर्माण झाल्यामुळे पीक डोळयासमोर मरताना बघून शेतकरी रडू लागला आहे. देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा हा शेतकरी शासन व प्रशासनाला ‘असं अर्धमेलं जगण्यापेक्षा साहेब! एकदा कायमचे मारून तरी टाका, आमचे वीज कनेक्शन कापून टाका!’ असे सांगत आहे. कारण कमी दाबामुळे येथील शेतकऱ्यांचे वीज उपकरण जळाले असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आर्थिक नुकसान भरपाई मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची ताकत त्यांच्या अंगात राहीली नसून तो हवालदिल दिसत आहे.
शासन शेतकऱ्यांना सतत १६ तास विज देण्यास असमर्थ ठरले आहे असे दिसून येत आहे. अनेक तांत्रीक कामाने दिवसभऱ्यातून ७-८ वेळा विज पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्याला पायपीट करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. शेतीला पाहिजे तेवढे सिंचन होत नसल्याने पिके करपत आहे. त्याचप्रमाणे विहीरी व बोरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे. पाण्याच्या उपसा कमी होतो व त्यातच विजेचा लंपडाव सुरू असतो त्यामुळे पिकांसाठी पूर्ण जमीन ओली होत नाही. परिणामी पीक करपत आहे, व काही शेतकऱ्यांना अर्धेच पीक होत आहे. त्यामुळे अर्ध्या पिकाची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे.
उत्पन्न घेण्यासाठी आलेला खर्चही त्यांना परतफेडीसाठी अडसर ठरत आहे. यातच अर्ध्या जमिनीचे येणारे पिकही सिंचनाअभावी पूर्णपणे कोमेजले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

पुढारी फक्त निवडणुकीपुरतेच
विविध क्षेत्रातील शासकीय कर्मचारी वेतनाचा लाभ घेत असतानासुध्दा संपावर जाण्याचे चित्र आपल्याला वेळोवेळी पहायला मिळते. परंतु शेतकरी संपावर गेला अशी परिस्थिती कधी पहायला मिळत नाही. आजची स्थिती शेतीसाठी पूरक नाही. अन्नदात्याला फाशी लागण्याची वेळ ओढवली असून यामध्ये शेतकरी पार होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे कैवारी आम्हीच म्हणणारे पुढारी गाजावाजा करून आपले नाव करून घेतात. मात्र शेतकऱ्यांची ही स्थिती बघूनही आता कुणीच पुढे येत नाही. त्यामुळे पुढारी फक्त निवडणुकीतच दिसतात असे येथील शेतकरी बोलत आहेत.

Web Title: Less power pressing done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.