अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2025 22:16 IST2025-01-29T22:16:56+5:302025-01-29T22:16:56+5:30
खोबा जवळील घटना : चार दिवसात दुसरी घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार
सडक अर्जुनी : रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२९) रात्री ८ वाजताच्या सुमारास नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील खोबाजवळ घडली.
नवेगावबांध-कोहमारा मार्गालगत नवेगाव व्याघ्र प्रकल्प लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एक बिबट्या रस्ता ओलांडताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान खोबा येथील गावकऱ्यांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे हे घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पंचनामा करून क्षेत्र सहायक संजय पटले, वनरक्षक प्रदीप हत्तीमारे, मुकेश चव्हाण, पुरुषोत्तम पटले, इंदू राऊत, वनमजूर रमेश मेश्राम, वाहन चालक समीर बन्सोड यांच्या मदतीने त्या मृत बिबट्याला कोहमारा वनक्षेत्रात नेण्यात आले. पुढील तपास वन विभागाचे कर्मचारी करीत आहेत. यापूर्वी २७ जानेवारीला रेल्वेच्या धडकेत एक बिबट ठार झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील टोयागोंदी जवळ घडली होती.