आघाडीतील बिघाडी वाढविणार ठोके

By Admin | Updated: October 22, 2016 00:27 IST2016-10-22T00:27:07+5:302016-10-22T00:27:07+5:30

जिल्ह्यात नगर पषिदेच्या निवडणुकीपूर्वी विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे.

Leading up to the momentum of the alliance | आघाडीतील बिघाडी वाढविणार ठोके

आघाडीतील बिघाडी वाढविणार ठोके

१९ नोव्हेंबर रोजी होणार मतदान : जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता

गोंदिया : जिल्ह्यात नगर पषिदेच्या निवडणुकीपूर्वी विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात येत्या १९ नोव्हेंबरला होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीनही पक्ष इच्छुक आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणे या मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार की नाही यावर बरीच गणितं अवलंबून आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्यास ती अनेकांसाठी हृदयाचे ठोके वाढविणारी ठरणार आहे.
या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती, नगर परिषद आणि नगर पंचायतींचे सदस्य मतदार राहणार आहेत. गोंदिया जिल्ह्यात २०० तर भंडारा जिल्ह्यातील १९५ मतदार या निवडणुकीत सहभागी होणार आहेत. यात शिवसेनेची सदस्यसंख्या स्वबळावर निवडणूक लढण्याइतपत दखलपात्र नसली भाजप-सेनेची युती या ठिकाणी कायम राहिल्यास भाजपचे पारडे जड होऊ शकते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास ती युतीवर भारी ठरून ही जागा आपल्याकडे कायम ठेवण्यात आघाडीला निश्चितपणे यश येऊ शकते.
मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे ज्या विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष लागून आहे. नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्यानंतर विधान परिषद निवडणूक लांबणीवर पडणार की काय, अशी चर्चा होत होती. मात्र विधान परिषद निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होणार असल्यामुळे विजयाचे गणित मांडण्यास वेग आला आहे.
गेल्या १२ वर्षांपासून या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार राजेंद्र जैन हे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीत जागा आपल्या वाट्यावर यावी यासाठी आघाडी करण्यावरून कुरबूर सुरू आहे. मात्र त्याचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही.
यापूर्वी डिसेंबर २०१० मध्ये ही निवडणूक झाली होती. त्यावेळी मतदारांची संख्या कमी होती. यावेळी नगरपंचायत सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाल्यामुळे ही संख्या वाढली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठीही सर्व पक्षांची तयारी सुरू आहे.
यावेळी भंडारा जिल्ह्यात मोहाडी, लाखनी, लाखांदूर तर गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव, मोरगाव अर्जुनी, सडक अर्जुनी, देवरी या नगर पंचायती अस्तित्वात आल्या आहेत. या १७ सदस्यीय नगर पंचायतीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी मतदार संख्या ३९५ झाली आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)

निवडणूक कार्यक्रम
२६ आॅक्टोबर रोजी निवडणूक कार्यक्रम घोषित होईल. २ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारणे, २ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी, ५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेण्याची तारीख, १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ४ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया होईल. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होईल, असा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केला.

छुपा पाठिंबा नाही
या निवडणुकीत राजकीय समीकरणे काय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष युती-आघाडी होणार का, कोण कोणाला छुपा पाठिंबा देणार का, याबाबत चर्चांना ऊत आला आहे. दोन दिवसांपूर्वी माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक इंगळे यांनी कोणताही संभ्रम न ठेवता भाजपने आपला उमेदवार उभा करावा, असे सूचित केले.

Web Title: Leading up to the momentum of the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.