तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात ‘मॉड्युलर’ प्रसुतीगृह सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:53 IST2017-05-01T00:53:35+5:302017-05-01T00:53:35+5:30
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात मॉड्युलर प्रसूतीगृह सुरू करण्यात आले असून त्यात प्रसूती रूग्णाला सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत.

तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात ‘मॉड्युलर’ प्रसुतीगृह सुरू
महिनाभरात ३९ प्रसुती : १०० खाटांचा प्रस्ताव मंत्रालयात
गोंदिया : तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात मॉड्युलर प्रसूतीगृह सुरू करण्यात आले असून त्यात प्रसूती रूग्णाला सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे नवीन आर्थिक वर्ष २०१७-१८ पहिल्याच एप्रिल महिन्यात तब्बल ३९ प्रसूती तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांनी सांगितले.
एप्रिल महिन्यात उपजिल्हा रूग्णालयात १३ सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून जननी सुरक्षा योजनेच्या कामात जिल्ह्यात अव्वल स्थान असल्याचेही सांगण्यात आले आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या टीम वर्कने एकही गुंतागुंत होवू न देता गरोदर रूग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविली आहे. पूर्वी प्रसूतीगृह म्हटले की एक खाट असायची व साधारण सुविधा असायचे. मात्र आता सुरू करण्यात आलेल्या सुसज्ज प्रसूतीगृहात स्टॅन्डर्ड आॅपरेटिंग सिस्टिमसह रूग्णांसाठी आरोग्य विषयक सूचना व मार्गदर्शन, डॉक्टरांसाठी मार्गदर्शन, शौचालयापासून ते इतर सर्व बाबींनी सोयीसुविधायुक्त बाबींचा समावेश त्यात आहे.
जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी वेळोवेळी केलेल्या आवश्यक सूचनेप्रमाणे जिल्ह्यात शून्य मातामृत्यू व शून्य बालमृत्यू अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात तत्पर व योग्य सेवा देवून या अभियानाला यशस्वी करण्यासाठी हातभार लावत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रूग्णालयातील मॉड्युलर प्रसूतीगृहाचे उद्घाटन नुकतेच आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. याचा लाभा आता रूग्णांना मिळू लागला आहे. आमदार रहांगडाले यांच्या विशेष प्रयत्नाने सद्यस्थितीत ५० खाटांचे असलेल्या तिरोडा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून १०० खाटांचे सुसज्ज रूग्णालय भविष्यात होण्याच्या मार्गावर आहे. त्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालय मुंबई येथे पाठविण्यात आला आहे.
विशेष म्हणजे कायाकल्प योजनेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आलेल्या या रूग्णालयाच्या सोयीसुविधेकडे शासन-प्रशासनाने आणखी लक्ष पुरविल्यास या रूग्णालयातून गंभीर रूग्णांना इतरत्र न हलविता तेथेच औषधोपचार केला जावू शकेल. (प्रतिनिधी)