माघारीसाठी उरले शेवटचे दोन दिवस
By Admin | Updated: December 28, 2016 02:27 IST2016-12-28T02:27:38+5:302016-12-28T02:27:38+5:30
गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत.

माघारीसाठी उरले शेवटचे दोन दिवस
सात जणांकडून आचारसंहिता भंग : उमेदवार घालताहेत मंदिरांमध्ये साकडे
गोंदिया : गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी आता केवळ दोन दिवस उरले आहेत. २९ ला दुपारी ३ पर्यंत नामांकन मागे घेता येणार आहे. रिंगणात कायम राहणाऱ्यांना ३० डिसेंबरला निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. मात्र नंतर प्रचारासाठी वेळ कमी मिळणार असल्यामुळे उमेदवारांनी आधीच प्रचार सुरू केला आहे. त्यात आपलाच विजय व्हावा यासाठी अनेक उमेदवार ठिकठिकाणच्या देवी-देवतांच्या मंदिरांमध्ये साकडे घालत आहेत.
गोंदियात नगराध्यक्षपदासाठी ३८ उमेदवारांनी ५२ नामांकन दाखल केले होते. तसेच ४२ नगरसेवकांच्या जागांसाठी २७७ नामांकन आले होते. त्यातून मंगळवारपर्यंत नगराध्यक्षपदासाठी नामांकन भरणाऱ्यांपैकी केवळ ३ लोकांनी तर नगरसेवकपदासाठीच्या १७ लोकांनी माघार घेतली. आता नामांकन मागे घेण्यासाठी बुधवार आणि गुरूवार हे दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या वॉर्डातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
जे उमेदवार माघार घेणार नाहीत अशा रिंगणातील उमेदवारांकडून प्रचार व भेटी गाठीसोबतच सध्या देवदर्शनाचे कार्य केले जात आहे. या नेतेमंडळींच्या दिवसाची सुरूवातच सध्या परिसरातील मंदिरात देव दर्शनापासून होत असून प्रचारानिमित्त जाईल त्या भागातील मंदिरात जाऊन देवाला माथा टेकवित आहेत. या निवडणुकीत विजयी होऊ दे हीच मागणी सर्व उमेदवार करीत असून विजयासाठी देवाला साकडे घातले जात आहेत.
निवडणूक लहान असो की मोठी, मात्र विजयाची आस सर्वांनाच असते. यामुळेच एरवी देवाची आठवण येवा न येवो मात्र निवडणूक म्हणताच सर्वप्रथम डोळ््यापुढे देवाची मुर्ती येते. असाच काहीसा प्रकार सध्या शहरात सुरू आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीला घेऊन रिंगणात उभे सर्व उमेदवार आपापल्या देवतांना आठवण करीत असून विजयासाठी देव पूजनाचे कार्यही आटोपत आहेत. एवढेच नव्हे तर सध्या या नेतेमंडळींच्या दिवसाची सुरूवात प्रथम मंदिरात देवदर्शन घेतल्यानंतरच होत आहे.
सर्वप्रथम मंदिरात हजेरी लावून देवाचे दर्शन घ्यायचे व त्यानंतरच प्रचार व लोकांच्या भेटीगाठी हा टाईमटेबलच सध्या रिंगणातील उमेदवारांनी बांधला आहे. त्यांच्या शेड्यूलदरम्यान येणाऱ्या प्रत्येकच भागातील व वाटेत येणाऱ्या मंदिरात जाऊन देवापुढे माथा टेकला जात आहे. एकंदर निवडणुकीने सर्वांनाच देवाची आठवण करवून दिली आहे. यामुळेच सर्वांची धाव सध्या मतदार व मंदिरांकडे वाढली आहे. निवडणुकीत मतदार मतदान करतील व त्याच भरवशावर आपण जिंकून येणार हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र आपल्या डोक्यावर देवाचा आशीर्वाद राहिल्यास आपण ही निवडणूक नक्कीच सर करू हा विश्वास बाळगून सर्वच उमेदवार दिवसातून कित्येक वेळा देवापुढे माथा टेकून त्याला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एवढेच नव्हे तर निवडणुकीतील विजयासाठी देवाला साकडे घालीत आहेत. हेच कारण आहे की, शहरातील काना कोपऱ्यातील मंदिरातही आता नेतेमंडळीची ये-जा वाढली आहे. (शहर प्रतिनिधी)
विधीवत पूजनाने कार्यालयांचा शुभारंभ
रिंगणात उभ्या उमेदवारांकडून त्यांचे प्रचार कार्यालयही प्रभाग व शहरात सुरू केले जात आहेत. कार्यकर्ते येऊन बसावे व निवडणुकीची कामे करता यावी यासाठी हे कार्यालय सुरू केले जात आहेत. मात्र कार्यालय ही शुभ लाभावे यासाठी या कार्यालयांचा शुभारंभही पंडीताच्या हातून विधिवत पूजन व मंत्रोच्चारातून करवून घेतला जात आहे. कार्यालयाच शुभारंभ शुभाशुभ व्हावा व निवडणुकीही शुभ ठरावी हाच या मागचा उद्देश आहे. ते काही असो, मात्र निवडणुकीने भल्याभल्यांना देवाची आठवण करवून दिल्याचे सध्या बघावयास मिळत आहे.
- दर्शन व महाआरत्यांचे आयोजन
नगरसेवकांसाठी होत असलेल्या निवडणुकीतील उमेदवार आपापल्या प्रभागातील मंदिरापर्यंत धाव घेत आहेत. मात्र नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात असलेल्या दिग्गजांकडून मतदारांना माहिती व्हावी व त्यातूनच देवपूजनाचे पुण्य लाटता यावे यासाठी सध्या शहरातील काना कोपऱ्यातील मंदिरांत देव दर्शन घेतले जात आहे. एवढेच नव्हे तर मंदिरात महाआरत्यांचे आयोजन करून त्यामाध्यमातूनही आपले प्रचार तंत्र चालविले जात आहे. काहीही करून मतदारांपर्यंत ही गोष्ट पोहचून आपला प्रचार व्हावी. तर या कार्यक्रमांच्या माध्यमातून देवाचा आर्शिवादही मिळावा हे दोन उद्देश उमेदवार या दर्शन व पूजनातून साध्य करीत आहेत.
मंदिरांवर बॅनर लावणे महागात पडले
गोंदियाच्या रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिव मंदिर व हनुमान मंदिरावर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षासह नगरविकास मंचच्या उमेदवारांकडून आपआपल्या पक्षाचे बॅनर व बोर्ड लावून विद्रुपीकरण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात रविवारी अर्चना विष्णू देशमुख, मोहम्मद खालीद युसुफ पठाण, राष्ट्रवादीचे अशोक गुप्ता, मौसमी परिहार, भाजपचे अशोक केशवराव इंगळे, भाजपचे शिवकुमार शंकरलाल शर्मा व पुरूषोत्तम मोदी या सर्वांवर मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.