जुन्या पाणी वितरिका मोजताहेत शेवटच्या घटका
By Admin | Updated: April 4, 2015 01:19 IST2015-04-04T01:19:47+5:302015-04-04T01:19:47+5:30
बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभागाने आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे

जुन्या पाणी वितरिका मोजताहेत शेवटच्या घटका
पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष : माल्ही, शंभुटोलाची दुर्दशा, शेतकऱ्यांना पाणी नाही
आमगाव : बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभागाने आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी सिंचन व्यवस्था झाली पाहिजे म्हणून गावातील परिसरागा लागून वितरिका तयार केल्या. मात्र ४५ वर्षापूर्वी तयार झालेल्या अनेक वितरिका आता शेवटच्या घटका मोजत आहेत. यात माल्ही, शंभुटोला परिसरातील वितरिका सदर विभागाच्या दुर्लक्षितपणाला बळी पडल्या आहेत.
या वितरिकांच्या दुर्गतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात खरीप व रबी पाणी जात नाही. तरीही त्यांच्या दुरूस्तीकडे लक्ष दिले जात नाही.
तीन धरणाचे पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळते. त्यात शेतकरी डिमांड भरुन लाखो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करतात. अनेक कर्मचारी अधिकारी शेतकऱ्यांना पाणी मिळण्याकरिता व व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत. मात्र फक्त कार्यालयात खुर्च्यात बसून पगार उचलण्याचेच काम शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता व इतर कर्मचाकी करताना दिसतात. ४० वर्षापूर्वी तयार झालेली माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेची दुर्गती बघितल्यानंतर शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न आज उपस्थित होत आहे.
१९६९, ७० व ७१ या तीन वर्षात आमगाव, माल्ही, शंभुटोला, महारीटोला पाणी वितरिकेचे काम करण्यात आले. हा तिन्ही गावांची शेती परिसर जवळपास २३०० एकराचा आहे. त्यात वितरिकेचे पाणी २१०० एकरात रबी व खरीप पिकाकरिता पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला पुरविला जातो व दोनशे एकर शेती कोरडवाहू आहे. प्रयत्न केला तर या शेतीला पाणी जाऊ शकतो, अशी पतिक्रिया पाणी बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
या दोनशे एकरात उत्पन्न घेणारे शेतकरी अधिकारी यांना वजन देऊन आपले उत्पन्न घेतात. मात्र या वितरिकेवर १५वर्षापूर्वी काम झाले पण ते थातूरमातूर करण्यात आले. उपसा केला जातो मात्र शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रकारे शेतीला पाणी मिळत नाही. लाखो रुपये पाणीपट्टी कराचे वसुल करुन शेतकऱ्यांना पाणी नाही. वितरिकेची दुर्दशा झाली आहे. अनेक ठिकाणी सिमेंट काम नासधुस झाले आहेत. केव्हाही वितरिका ओलांडतानी धोका होऊ शकतो. मात्र अधिकारी वितरिकेच्या कामासाठी पूर्णपणे उदासीन आहेत किंवा त्याचे लक्ष नाही. बनगाव येथील नगराजवळील कालव्यात नागरिकांनी सांडपाणी सोडण्याचे पाईप लावले आहेत. दूषित पाण्यामुळे रोगराई पसरू शकते. त्याकडे लक्ष नाही. आज वितरिकेत पाणी नाही. मागील वर्षी रबीसाठी पाणी मिळाले नव्हते. शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाण्याकरिता कवायत करावी लागली. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा विचार करावा
रोटेशननुसार यावर्षी वितरिकेला रबी पाणी नाही, मात्र पाण्याची भिषणता लक्षात घेता आठवड्यातून एकदा तरी पाणी देणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनी माल्ही वितरिकेला पाणी जाऊ नये यासाठी वितरिकेत सिमेंट बांधकाम केल्याने एक थेंब पाणी येत नाही. एकंदरित आमगाव, माल्ही, शंभुटोलाला महारीटोला वितरिकेचे काम होणे गरजेचे आहे. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे फटका शेतकऱ्यांना बसत आहे.