लाखो रुपयांचा बंधारा निकामी

By Admin | Updated: July 12, 2014 01:26 IST2014-07-12T01:26:10+5:302014-07-12T01:26:10+5:30

झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बाबा मेळघाट कोल्हापूरी बंधाऱ्याचे बांधकाम झाले. कालव्यासाठी शेतकऱ्यांना ...

Lakhs of Rupees Bonds | लाखो रुपयांचा बंधारा निकामी

लाखो रुपयांचा बंधारा निकामी

संतोष बुकावन अर्जुनी/मोर.
झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बाबा मेळघाट कोल्हापूरी बंधाऱ्याचे बांधकाम झाले. कालव्यासाठी शेतकऱ्यांना जमिनी २० वर्षापूर्वी अधिग्रहीत झाल्या. लाखों रुपयांचा बंधारा बांधण्यात आला. कालवा तयार झाला. मात्र अद्यापही थेंबभर पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होऊ शकले नाही. खांबी/पिंपळगाव येथील शेतकरी आजही चातकासारखी सिंचनाच्या पाण्याची प्रतिक्षा करीत आहेत.
अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आ. राजकुमार बडोले यांनी २००९ मध्ये तालुक्यातील २० गावे दत्तक घेतली. त्यातील खांबी/पिंपळगाव हे एक आहे. या गावचे पुरुषोत्तम डोये हे दत्तक ग्राम समितीचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष व समितीने आमदारांकडे खांबी गावातील २० समस्यांचा आराखडा २००९ मध्ये आमदारांकडे सुपूर्द केला. या गावातील समस्या साडेचार वर्षातही पूर्ण होऊ शकल्या नाहीत, असे गावकरी, समितीचे पदाधिकारी व सरपंच यांची म्हणणे आहे.
मेळघाट कोल्हापूरी बंधाऱ्यासाठी शासनाचे लाखों रुपये खर्च झाले. कालवे तयार झाले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कालवा गेला त्याचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळाला नाही. उलट शेतजमिनीतून कालवा गेल्यामुळे काही शेतकरी भूमीहिन झाले. शेतकऱ्यांना अद्याप थेंबभर सिंचनाचे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. हे दत्तक ग्राम योजनेतील प्रमुख मागणी होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची खांबी या गावाच्या नावाने अस्तित्वात आहे. ८० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी तयार करण्यात आली. १९ गावांसाठी ही योजना आहे. मात्र या पाणीपुरवठा योजनेचा थेंबभर पाणी गावकऱ्यांना मिळाले नाही. खांबी पाणी पुरवठा योजनेच्या नावे दरवर्षी लाखों रुपयांचा निधी येतो. पण हा नेमका कुठे खर्च होतो असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल रेवीचंद फुंडे हा युवक पूर्णत: अपंग आहे. दत्तक ग्राम योजनेच्या सभेत आ. बडोले यांनी या युवकाला दरमहा ५०० रुपये मदत देण्याची घोषणा केली. मात्र गेल्या साडेचार वर्षात एकही पैसा देण्यात आला नसल्याचे दत्तक ग्राम योजनेचे पदाधिकारी सांगतात. दलित वस्तीत १ कि.मी. रस्त्याचे सिमेंटीकरण अथवा खडीककरण शिल्लक आहे. खांबी या गावची लोकसंख्या १३७० आहे. शेती व मजुरी हे रोजगाराचे साधन आहे. या गावातील ७० टक्के लोक रोजगारासाठी हंगामात स्थलांतर करतात. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या गावावरून वाहतुकीची साधने नाहीत.
दिवसातून केवळ एक बस एकदाच ये-जा करते. स्वत:च्या वाहनाने गावकरी ये-जा करतात. गतवर्षी शालेय विद्यार्थ्यांना एस.टी. बसच्या पासेस देण्यात आल्या मात्र बस उपलब्ध झाली नाही. विद्यार्थी सायकल व पायदळ चार कि.मी. अंतरावरील बोंडगावदेवी येथे शिक्षणासाठअी ये-जा करतात. आमदारांकडे सिंचन, नळयोजना यासारख्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. मात्र समस्यांचे निराकरण झाले नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जॉब कार्डधारकांना शासनाने वर्षात किमान शंभर दिवस रोजगाराची हमी दिली असली तरी या गावात १०० दिवस रोजगार उपलब्ध झाले नाही.
खांबी हे गाव दत्तक घेताना २० समस्या मांडण्यात आल्या. गेल्या साडेचार वर्षात यापैकी केवळ चार समस्यांचे निराकरण झाले. उर्वरित १६ समस्या अजूनही कायम आहेत. दत्तक गावांसाठी आमदारांनी आमदार निधीचा पुरेसा वापर केला नाही. साडेचार वर्षात गावाच्या दृष्टीने खांबी ते इंजोरी व खांबी ते निमगाव रस्त्यावरील नाल्यांवर लहान पुलांचे महत्वपूर्ण काम झाले. या गावातील ९० टक्के अतिक्रमणधारकांना वनजमिनी कायद्यांतर्गत पट्टे मिळाले. बंधारा बांधकामाचे पाईप, लोखंडी पत्रे, दरवाजे, आदी चोरीला गेले असल्याचे सांगितले जाते. कंत्राटदाराने या साहित्याचा वापर केला नसल्याचे काही लोक सांगतात.
या संदर्भात सरपंच शारदा खोटेले यांच्याशी चर्चा केली असता आ. बडोले यांनी केवळ दोनदा गावात भेट दिली. एकदा मंदिराच्या भूमिपूजनासाठी तर दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीदरम्यान खा. नाना पटोले यांंच्यासोबत प्रचारासाठी आल्याचे सांगितले. गावकऱ्यांशी चर्चा केली असता आमदार हा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो त्यांनी वर्षातून किमान दोनदा गावात भेट द्यावी. विकासकामे करावी हे गाव केवळ कागदोपत्री दत्तक म्हणून नोंद आहे. जी नैसर्गिक विकासकामे व्हायची तेवढीच कामे झाली.आमदारांने गाव दत्तक घेतले तेव्हापासूनच ते या गावापासून दूरावले अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Web Title: Lakhs of Rupees Bonds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.