लाखोंची वसुली, मात्र क्षेत्रफळाबाबत अनभिज्ञ
By Admin | Updated: September 25, 2015 02:23 IST2015-09-25T02:23:26+5:302015-09-25T02:23:26+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी आठवडी बाजाराचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. जिल्हा परिषद दरवर्षी त्या क्षेत्राच्या लिलावाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करते,

लाखोंची वसुली, मात्र क्षेत्रफळाबाबत अनभिज्ञ
पंचायत विभागाचा कारभार : बाजाराच्या जमिनीवर धनदाडंग्यांचे अतिक्रमण
अर्जुनी-मोरगाव : जिल्ह्यात विविध ठिकाणी आठवडी बाजाराचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. जिल्हा परिषद दरवर्षी त्या क्षेत्राच्या लिलावाच्या माध्यमातून लाखोंची कमाई करते, मात्र आठवडी बाजाराची गावनिहाय नेमकी मालकीची किती जागा आहे यापासून जि.प.चे अधिकारी अनभिज्ञ आहेत.
बाजाराच्या कोट्यवधीच्या या जमिनींवर धनदांडग्यांनी अतिक्रमण करुन त्या जमिनी बळकावल्या आहेत. याचा बाजारावर विपरीत परिणाम होत असून आठवडी बाजार गावागावातील रहदारीच्या रस्त्यावर भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरकर यांनी घेतलेल्या माहितीच्या अधिकारातून हे वास्तव उघड झाले आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील २९ बैठकी, ३ गुरांच्या व ३ यात्रा बाजारांचा लिलाव होतो. यात गोंदिया तालुक्यातील मुरदाडा, कामठा, अदासी, रावणवाडी, दासगाव-बु. पांढराबोडी व काटी, तिरोडा तालुक्यातील आमगाव व टेरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अर्जुनी-मोर व नवेगावबांध, सालेकस तालुक्यातील कोटजांभोरा, आमगाव खुर्द, जमाकुडो, पाथरी, व साकरीटोला, सडक-अर्जुनी तालुक्यातील सडक-अर्जुनी, सौंदड व पांढरी, गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, कुऱ्हाडी व चोपा तर देवरी तालुक्यातील सावली-डो, चिचगड व ककोडी येथील बैठकी बाजारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सडक-अर्जुनी, पांढरी व सावली-डो येथे गुरांचा तर तिरोडा तालुक्याच्या सुकडी-डाकराम, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड व गोरेगाव तालुक्यातील पोंगेझरा येथे यात्रा बाजार भरतो.
आठवडी बाजारातून जिल्हा परिषदेला भरपूर उत्पन्न मिळत असले तरी याबाबत जिल्हा परिषद मात्र गंभीर नाही. काही गावांमध्ये जिल्हा परिषद व काही ठिकाणी ग्रामपंचायत आपापल्या स्तरावर बाजारांचे लिलाव करते. या बाजाराच्या जागेवर स्थानिक धनदाडंग्यांनी अतिक्रमण केले आहे. बाजारात व्यापारी जिथे जागा मिळेल तिथे आपली दुकानदारी थाटतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेक मोठ्या गावांमध्ये तर मुख्य रहदारीचे रस्तेच बंद झाले आहेत. यामुळे आता बाजाराच्या जागा स्थालांतरीत करणे आवश्यक झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या या कानाडोळा प्रवृत्तीमुळे दरवर्षी मिळणारा लाखो रुपयांचा महसूल बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बाजाराच्या जागेवर अतिक्रमण वाढत असले तरी जि.प. ची मालमत्ता असल्याने स्थानिक ग्रामपंचायती अशा अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करतात. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये हिच बोंब आहे. आठवडी बाजाराच्या या जागा मोक्याच्या ठिकाणी असल्याने त्यांचे बाजारमूल्य कोट्यवधीच्या घरात आहे. (तालुका प्रतिनिधी)