२५ वर्षांपासून नागरी सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:39 IST2017-02-27T00:39:14+5:302017-02-27T00:39:14+5:30
शहरातील नवीन आयटीया भागातील म्हाडा कॉलनीत प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

२५ वर्षांपासून नागरी सुविधांचा अभाव
वर्धा : शहरातील नवीन आयटीया भागातील म्हाडा कॉलनीत प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गत २५ वर्षांपासून येथील रहिवासी प्राथमिक सुविधांपासून वंचित असून सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनातून, २५ वर्षापूर्वी महाराष्ट्र हाऊसिंग अॅन्ड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड (म्हाडा) नागपूर यांनी मध्यम उत्पन्न गटातील लोकांना राहण्याकरिता (एम.आय.जी. ८०) घरे बांधून दिलीत. म्हाडा सोबत झालेल्या करारानुसार त्यावेळी म्हाडा नागपूर हे बोर द्वारे होत असलेल्या पाणी पुरवठ्याचे देयक महावितरणला करीत होते. नंतर म्हाडा नागपूर यांनी देयक न भरल्याने महावितरणने विद्युत जोडणी कापली. त्यामुळे घागर-घागर पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने काहींनी नगराध्यक्षांना याची माहिती दिली. त्यावर नगराध्यक्षांनी नपच्या पाण्याचा टॅक्स भरा नंतर पाण्याची लाईन जोडून देता येईल, असे सांगितले. त्यावरून काहींनी टॅक्स भरल्याने पाण्याची लाईन जोडून दिली आहे. परंतु, अजुनही येथे काही प्राथमिक सुविधा नाहीत. येथे पक्के रस्ते नाही, पक्क्या नाल्या नाहीत असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. सदर प्रकरणी योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर गु.वि. गव्हाळे, अ.बा. आवरकर, ए.पी. गुजर,एस.डी.चावरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.(शहर प्रतिनिधी)