प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव
By Admin | Updated: September 27, 2014 01:55 IST2014-09-27T01:55:25+5:302014-09-27T01:55:25+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे अस्वच्छता असल्याचा आरोप रुग्णांनी केला.

प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव
तिरोडा : प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे अस्वच्छता असल्याचा आरोप रुग्णांनी केला. गरोदर माता व कुटुंबनियोजन करणाऱ्या महिलांना फक्त एक-दोन गोळ्या दिल्या जातात. सायरपचा साठाच नसल्याने रुग्णांमध्ये असंतोष आहे. फॉलीक अॅसीड व कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. योग्य काळजी घेत नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. आरोग्य केंद्रात फार्मसिस्ट यासारखे पद रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
रूग्णालयात भरती असलेल्या ज्योती सोयाम भजेपार, हेमलता मेश्राम, ज्योत्स्ना योगेश्वर कटरे वडेगाव, शिल्पा बिसेन खेडेपार, पौर्णिमा बिसेन वडेगाव, रत्नकला पटले खेडेपार यांनी योग्य औषधोपचार व डॉक्टरांची सकाळी दररोज भेट नसून सायरप न दिल्याचा आरोप सदर प्रतिनिधीकडे केला आहे.
पिण्याच्या पाण्याच्या जागेत अस्वच्छता दिसून आली असून विविध योजनांच्या तसेच दर्शनी भागावरील फलकावरील माहिती अद्यावत केलेली नव्हती. डॉक्टरांची बदली झाली असली तरी त्यांचेच नाव फलकावर होते.
या दवाखान्याच्या बाबतीत अनियमितता असल्याच्या पं.स. सदस्यांच्या तोंडी तक्रारीवरून खंड विकास अधिकारी पं.स. तिरोडा व पं.स. सदस्य शंकर बिंझाडे यांनी भेट देवून चौकशी केली. त्यात विविध चुका दिसून आल्या. रोख पुस्तिका व बँकेचा ताळमेळ बसत नाही, अशा त्रुट्या असून रोख पुस्तिकेमधील जि.प., पं.स. लेखासंहिता १९६८ मधील तरतुदीप्रमाणे लिहावे. शिर्षकनिहाय जमा-खर्च लिहावे, मासिक गोषवारा काढावा, रेकार्ड अद्यावत करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश खंड विकास अधिकारी जमईवार यांनी दिले.
एक डॉक्टर व फार्मसिस्टचे पद रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. पदांची भरती करावी अशी जनतेची मागणी आहे. येथील रुग्णांना ‘रेफर टू तिरोडा-गोंदिया’ येथे थोड्या थोड्या कारणासाठी पाठविल्या जात असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.
ओपीडी रजिस्टरवर खोडतोड करून चिठ्ठ्या चिपकवल्याचे निदर्शनात आले आहे. रजिस्टरवर लिहिण्याचे काम कुणाचे आहे? याबाबत संभ्रमाची स्थिती दिसून आली.
रूग्णालयात रुग्णांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी जनतेने केली आहे. (शहर प्रतिनिधी)