लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत सालईटोला मार्गावर मंगळवारी (दि.२) रात्री १०:४५ वाजता रक्ताच्या थारोळ्यात हनसलाल भंडारी पाचे (३७, रा. रायपूर, ता. जि. गोंदिया) या मजुराचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा व दवनीवाडा पोलिसांनी केला असून ठेकेदारानेच मजुरीच्या पैशांच्या वादातून त्याला ठार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी (दि.६) दोघांना अटक केली आहे.
मंगळवारी (दि.२) रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास ग्राम रायपूर ते सालईटोला मार्गावर हनसलाल पाचे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दवनीवाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व दवनीवाडा पोलिसांनी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करून तपास सुरू केला.
हनसलाल पाचे हा आरोपी कपूरचंद उर्फ बंटी हरिचंद ठाकरे (३९) याच्याकडे बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करीत होता. मजुरीच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. मंगळवारी (दि.२) रात्री हनसलाल याने मद्यप्राशन करून कपूरचंदकडे मजुरी मागितल्यामुळे दोघांत भांडण झाले होते.
या भांडणात आरोपीने प्रथम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्यानंतर धारदार शस्त्राने डोक्यावर वार करून हनसलालचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले. यावर पोलिसांनी कपूरचंद ठाकरे (३९) व ओंकार चेतराम नेवारे (५२, रा. रायपूर, ता. जि. गोंदिया) यांना शनिवारी (दि.६) रायपूर येथून अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास दवनीवाडा पोलिस करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साहील झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, पोनि. वैशाली ढाले, सपोनि. धीरज राजुरकर, संजय टेकाम, पोउपनि. वनिता सायकर, शरद सैदाने, महेश राठोड तसेच गुन्हे शाखा व दवनीवाडा ठाण्यातील अंमलदारांच्या संयुक्त पथकाने केली आहे.