कुणबी समाजाने उद्योगाकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 00:25 IST2016-10-20T00:25:33+5:302016-10-20T00:25:33+5:30
वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे.

कुणबी समाजाने उद्योगाकडे वळावे
भुनेश्वर शिवणकर : कोजागिरी उत्सव, फलकाचे अनावरण
अर्जुनी मोरगाव : वर्षानुवर्षे शेती करणारा कुणबी समाज मागासला. शासक असणारा समाज आज आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात दुबळा होत आहे. शासन प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नाही. गत वैभव प्राप्त करण्यासाठी समाजाने आपसातील मतभेद विसरुन शेतीला पुरक व्यवसाय करावा. तांत्रिक कौशल्य प्राप्त करुन प्रत्येकाने उद्योजक व्हावे, असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र गोंदियाचे अधीक्षक भुनेश्वर शिवणकर यांनी केले.
ते तालुकास्तरीय कुणबी समाज बहुउद्देशिय सेवा संस्था द्वारे आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सव समारोहात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी डॉ. दिलीप काकडे होते. उद्घाटन योग प्रशिक्षक दादा फुंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य किशोर तरोणे, कृउबास उपसभापती लायकराम भेंडारकर, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, पं.स. सदस्य पिंगला ब्राम्हणकर, नगर पंचायत नगरसेविका येमू ब्राम्हणकर, गीता ब्राम्हणकर, लक्ष्मी धान गिरणी अध्यक्ष कांता पाऊलझगडे, कार्यकारिणी अध्यक्ष अनिरुद्ध ढोरे उपस्थित होते.
किशोर तरोणे यांनी संबोधनातून कुणबी समाजाने प्रत्येक ठिकाणी नेतृत्व करावे. प्रवाहाच्या विरुद्ध जावून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याचे आवाहन केले. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी, जो समाजासाठी राबला तो समाजाला लक्षात राहिला. शेतकऱ्यांची मुले शिकल्याशिवाय शेतकऱ्यांचा घामाला दाम मिळणार नसल्याचे सांगितले. दादा फुंडे यांनी योगगुरु बाबा रामदेव यांच्या नागपूर येथील फुडपार्कमध्ये येणाऱ्या दिवसात दुधासोबतच गाईचे गोमूत्र, गुरवेल, ज्वारफाटा याची गरज पडेल. ही शेती करा. प्रगतीमध्ये श्रम आवश्यक असते. समाजाने स्वत:सोबत इतर जातीधर्मांनाही सोबत घेवून चालावे, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. दिलीप काकडे यांनी, समाजाने क्रांतीसाठी डॉ. बाबासाहेब व भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवा. बुद्धांचे तत्वज्ञान अंगिकारा. मराठा मूक मोर्चा कुणबीयांचे संयम दर्शविते. विचार स्वीकारा, क्रांती होईल. संघटन हे येणाऱ्या पिढीसाठी आहे. नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा संघटन मजबूत करा, असे मत मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात संतसिरोमणी तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व माल्यार्पणाने झाली. उरी हमल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमापूर्वी लाखांदूर रोडवरील टी-पार्इंटला छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून नामकरण केले गेले. फलक व ध्वजाचे अनावरण झाले. संघटनेच्या वतीने तालुक्यातील १३ गावांमधील गाव कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. दहावी व बारावीमधील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक अनिरुद्ध ढोरे यांनी मांडले. संचालन पद्मजा मेहंदळे यांनी केले. आभार सुनिता हुमने यांनी मानले.
कार्यक्रमासाठी समाज संघटना, जिजाऊ महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी )