कृष्णाने वाचविले बहिण-भावाला
By Admin | Updated: January 31, 2016 02:02 IST2016-01-31T02:02:11+5:302016-01-31T02:02:11+5:30
‘देव तारी त्याला कोण मारी,’ याप्रमाणे विद्युत प्रवाहच्या अतिदाबातून कृष्णा किशोर रहांगडाले या १२ वर्षाच्या मुलाने एकाच कुटूंबातील भाऊ-बहीणीला वाचविले.

कृष्णाने वाचविले बहिण-भावाला
गोंदिया : ‘देव तारी त्याला कोण मारी,’ याप्रमाणे विद्युत प्रवाहच्या अतिदाबातून कृष्णा किशोर रहांगडाले या १२ वर्षाच्या मुलाने एकाच कुटूंबातील भाऊ-बहीणीला वाचविले. या कृष्णाच्या धाडसाचे गोंदिया येथील कन्हारटोलीमध्ये कौतुक होत आहे.
१४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता कन्हारटोली येथील स्वदेश ठाकुर याच्या घराच्या छतावर पलक व वैभव ठकरानी दोघे ही भाऊ-बहीण खेळत होते. पलक ही मुलगी ११ वर्षाची असून ती ५ व्या वर्गात शिकत आहे. तर तिचा भाऊ वैभव ९ वर्षाचा तिसरीचा विद्यार्थी आहे. घटनेच्या दिवशी पलक व वैभव आपल्या घरून स्वदेश ठाकूर यांच्या घरी खेळण्याकरिता गेले.
ज्या घरावरील छतावर दोघे भावंडे खेळत होती. त्या शेजारी एक मुलगा पतंग उडवित होता. पतंग जवळ आल्याने मुलगी पलक हिने लोखंडी पाईपने पतंग पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेजारून ६६ केव्हीचे एलटी विद्युत तार गेल्याने तिला करंट लागला. तिला वाचविण्यात भाऊ वैभव गेला मात्र त्यालाही करंट लागला. दोघेही छतावर बेशुध्द झाले. याचवेळी कृष्णा किशोर रहांगडाले (१२ ) विद्यार्थी या दोन भावंडासोबत खेळण्याकरीता छतावर आला. त्याने लोखंडी पाईप विद्युत तारेला लागला होता. लगेच कृष्णाने छतावरील बांबू घेऊन त्याने लोखंडी पाईपला मारले. तेव्हा पाईप तारावरून खाली पडला. कृष्णाने घरी जाऊन आईला सांगितले. आरडाओरड सुरू झाली नागरीक जमा झाले. पलक व वैभवचे आई-वडील आले त्यांना गोंदिया येथील रुग्णालयात उपचाराकरिता घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याची रुग्णालयातून सुट्टी झाली. कृष्णा आमगाव तालुक्यातील वडद येथील सरपंचाचा मुलगा आहे. कृष्णा हा आपल्या मामाच्या घरी शिक्षण घेत आहे. कुठे तरी पुस्तकात आपण वाचले होते. त्यामुळे बांबूनी काठी मारल्याने विद्युत प्रवाहाचा शॉक लागत नाही अशी कल्पना होती. त्यामुळे मोठे धाडस केले असे त्याने सांगितले. (तालुका प्रतिनिधी)