कोरंबीटोलाची तीर्थस्वरी सर्वात कमी वयाची तर बोंडगावदेवीचे नेवारे सर्वात ज्येष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:45 IST2021-02-05T07:45:50+5:302021-02-05T07:45:50+5:30

गोंदिया : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा प्रथमच मतदारांनी १६ टक्के तरुण उमेदवार तर ६५ टक्के महिला ...

Korambitola's Tirthaswari is the youngest and Bondgaon Devi's Neware is the oldest | कोरंबीटोलाची तीर्थस्वरी सर्वात कमी वयाची तर बोंडगावदेवीचे नेवारे सर्वात ज्येष्ठ

कोरंबीटोलाची तीर्थस्वरी सर्वात कमी वयाची तर बोंडगावदेवीचे नेवारे सर्वात ज्येष्ठ

गोंदिया : जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा प्रथमच मतदारांनी १६ टक्के तरुण उमेदवार तर ६५ टक्के महिला उमेदवारांना निवडून पाठविले. यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोरंबीटोला या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये २२ वर्षीय तीर्थस्वरी पोवळे ही सर्वात कमी वयाची सदस्य निवडून आली. तर याच तालुक्यातील बोंडगावदेवरी या ११ सदस्यीय ग्रामपंचायतमध्ये ६५ वर्षीय डॉ. शामकांत नेवारे हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत.

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतच्या एकूण १६९३ जागांसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यासाठी १६९३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा प्रथमच युवा वर्गानेसुद्धा उडी घेतली होती. जिल्ह्यात १८ ते ३२ वयोगटातील २५६ युवा उमेदवार निवडून आले तर ९३० महिला उमेदवार निवडून आल्या. तर उर्वरित उमेदवारांमध्ये ३५ ते ६५ वयोगटातील उमेदवारांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणूक प्रामुख्याने स्थानिक स्तरावर लढविली जात असते. पॅनल तयार करून निवडणूक लढविताना यंदा तरुण उमेदवारांना ग्रामपंचायतीत संधी दिली. तर मतदारांनीही गावाच्या विकासासाठी तरुणांवर विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दोन ग्रामपंचायती चांगल्याच चर्चेत आहे. कारण कोरंबीटोला ग्रामपंचायतमध्ये सर्वात कमी म्हणजे २२ वर्षीय तरुणी तीर्थस्वरी पोवळे ही निवडून आली. तर बोंडगावदेवी ग्रामपंचायतमध्ये तीनदा सरपंच आणि एकदा जि.प.सदस्य राहिलेले डाॅ.श्यामकांत नेवारे हे सर्वात ज्येष्ठ सदस्य निवडून आले.

.......

२२ वर्षीय तीर्थस्वरी ग्रॅज्युएट

कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि निवडणुकीचा अनुभव नसताना तीर्थस्वरी हेमंत पाेवळे या २२ वर्षीय तरुणीने ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली आणि निवडून आली. तिचे ग्रॅज्युएशन नुकतेच पूर्ण झाले असून ती भूगोल या विषयात एम.ए. करीत आहे. ग्रामसभेबाबत महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यावर तिचा भर असणार आहे.

......

नेवारे करणार अनुभवाचा गाव विकासासाठी उपयोग

बोंडगावदेवी ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य डॉ. श्यामकांत नेवारे हे बी.ए.एम.एस. डॉक्टर आहेत. ते बारा वर्ष सरपंच आणि पाच वर्ष जि.प. सदस्य राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव अधिक आहे. गावकऱ्यांनी सुद्धा त्यांच्यावर सलग पाचव्यांदा विश्वास व्यक्त करीत त्यांना गाव विकासाची संधी दिली आहे. आपल्या अनुभवाचा वापर गाव विकासासाठी करणार असल्याचे नेवारे यांनी सांगितले.

.....

निवडून आलेले एकूण सदस्य : १६९३

निवडून आलेल्या एकूण महिला सदस्य : ९३०

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या : १८९

.......

कोट :

गावकऱ्यांनी आपल्यावर मोठ्या विश्वासाने गावाच्या विकासाची जबाबदारी सोपविली आहे. ती यशस्वीपणे पार पाडून गावाच्या विकासाला गती देऊन महिलांमध्ये जनजागृती करण्यावर माझा भर असणार आहे.

- तीर्थस्वरी पोवळे, सदस्य

......

ग्रामपंचायतच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी आपल्या गावात करुन असलेल्या अनुभवाचा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करुन घेणार आहे.

- डाॅ. श्यामकांत नेवारे, सदस्य

Web Title: Korambitola's Tirthaswari is the youngest and Bondgaon Devi's Neware is the oldest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.