कोल्हापुरी बंधाऱ्यांना ग्रहण
By Admin | Updated: June 11, 2015 00:47 IST2015-06-11T00:47:47+5:302015-06-11T00:47:47+5:30
तालुक्यात तयार करण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वस्तू ठरले आहेत.

कोल्हापुरी बंधाऱ्यांना ग्रहण
अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ८० टक्के शेती सिंचनापासून वंचित
राजेश मुनिश्वर सडक-अर्जुनी
तालुक्यात तयार करण्यात आलेले कोल्हापुरी बंधारे केवळ शोभेच्या वस्तू ठरले आहेत. त्यामुळे तालुक्यातील ८० टक्के शेती सिंचनापासून वंचित आहे. जणूकाय या कोल्हापुरी बंधाऱ्यांना ग्रहण लागले की काय? असेच वातावरण दिसून येत आहे.
तालुक्यातील रेंगेपार, बाह्मणी, खडकी, कनेरी, मनेरी, वडेगाव, शेंडा, जांभळी, कोयलारी, कोसलतोंडी, पांढरी, डव्वा, सौंदड, खजरी, बिंद्राबन, कोदामेडी या परिसरात बांधण्यात आलेले कोल्हापुरी बंधाऱ्यांकडे अधिकारी व लोकप्रतिनिधींचे ठाम दुर्लक्ष आहे. त्यामुळे एखाद्या कपाटात शोभेची वस्तू ठेवल्याप्रमाणे हे कोल्हापुरी बंधारे नदीच्या पात्रात मांडून ठेवल्यासारखेच वाटते. लाखो रुपये खर्च करून या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा पाणी शेतकऱ्यांना एकवेळसुद्धा मिळणे कठीण झाले आहे.
नियोजनाअभावी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भलत्याच ठिकाणी बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याची योग्य प्रमाणात साठवणूक होत नाही. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ नावापुरतेच कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना ‘अर्धे तुमचे व अर्धे आमचे’ हे धोरण समोर ठेवून बंधाऱ्याचे बांधकाम केल्याचे चित्र दिसून येत आहे. दहा वर्षांपूर्वी वडेगाव गावालगत वाहणाऱ्या उमरझरी नाल्यावर दोन बंधारे बांधण्यात आले होते. हे कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. ज्यावर्षी बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले, त्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून या बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नाही. त्यामुळे या बंधाऱ्याचे बांधकाम कशाकरिता? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बंधाऱ्याला लावलेल्या लोखंडी पट्ट्या चोरांनी चोरून नेल्या की कुणी विकून खाल्या, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. वडेगाव जवळील काळा गोटा १ व २ ठिकाणी मोठे बंधारे आजही मोठ्या ऐटीत उभे आहेत.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने लक्ष दिल्यास वडेगाव, परसोडी, रेंगेपार, डोंगरगाव, खजरी, नवाटोला, डोयेटोला, केसलवाडा, पांढरवाणी, मुनिश्वरटोला या गावातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली हमखास येवू शकते. त्यामुळे भाजीपाला, ऊस, टरबूज, धान शेतीचे उत्पादन काढू शकतात. त्याचबरोबर रबी पिके घेऊ शकतात. या दोन्ही बंधाऱ्यांचे खऱ्या अर्थाने नियोजन केल्यास परिसराच्या गावातील पाण्याची पातळी उंचावेल. त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. तालुक्यातील अन्य निकामी ठरलेल्या बंधाऱ्यांची देखभाल दुरूस्ती केल्यास शेतकऱ्यांना या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध होऊन दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल.
पांढरी, कोसमतोंडी, सौंदड, डोंगरगाव-डेपो, झेंडा, बाम्हणी-खडकी, रेंगेपार, जांभळी-दोडके, डव्वा, बोथली, मुरपार, मनेरी, चिखली या परिसरात प्रामुख्याने निकामी बंधारे आजही पहावयास मिळत आहेत. या सर्व निकामी बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास पाण्याचा स्तर तर उंचावेल, पण त्याचबरोबर शेतीला सिंचनाची हमखास सोय होईल. उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही. सिंचनासाठी पाण्याची सोय असेल तर शेतकरी टिकून राहतील. लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी बंधाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.
काही गावात सिंचनाची सोय नसल्यामुळे खरीप पिके घेऊन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिक इतरत्र शहराकडे रोजगाराच्या शोधात जातात. मात्र सिंचनाची सोय झाल्यास शेतकरी सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही व त्यांची भटकंतीसुद्धा थांबेल.
सडक-अर्जुनी तालुक्यातील थाटेझरी, गिरोला, म्हसवाणी, डव्वा, घोटी या गावातील निकामी बंधाऱ्यांची जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुरूस्तीचे कामे करण्यात येणार आहेत. केसलवाडा गावाजवळील कोल्हापुरी बंधारा मग्रारोहयोअंतर्गत होऊ शकतो.
किशोर शेट्टी,
शाखा अभियंता
लघु पाटबंधारे विभाग, आमगाव