कायद्याची जाण असायला हवी
By Admin | Updated: November 10, 2014 22:46 IST2014-11-10T22:46:39+5:302014-11-10T22:46:39+5:30
भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले

कायद्याची जाण असायला हवी
गोंदिया : भारताच्या राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमुळे व्यक्ती आपला विकास करतो. एका व्यक्तीच्या अधिकारांचे दुसऱ्या व्यक्तीकडून उल्लंघन झाले तर त्या व्यक्तीवर अन्याय होतो. हा अन्याय होऊ नये, आपले अधिकार ठिकवून ठेवण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला कायद्याची जाण असायला हवी. ज्यामुळे अन्याय होत असेल तर न्यायालयात दाद मागता येते व न्याय मिळतो, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग. गिरटकर यांनी व्यक्त केले.
रविवारी राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त डोंगरगाव येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रापंचायत डोंगरगाव येथे ग्राम विधी व दक्षता केंद्राच्या उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न्या. गिरटकर होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया, ग्रामपंचायत डोंगरगाव, म.गां. तंमुस डोंगरगाव, जिल्हा वकील संघ गोंदिया व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती कार्यक्रम, पंचायत समिती, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ९ नोव्हेंबर रोजी महिलांकरिता व गावातील इतर नागरिकांकरिता कायदेविषयक साक्षरता शिबिराचे आयोजन तसेच ग्रामपंचायत कार्यालय, डोंगरगाव येथे ग्राम विधी दक्षता व सहायता केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची औपचारिक सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. प्रास्ताविकपर मार्गदर्शन तसेच विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनतेसाठी योजनांबद्दलची माहिती निखिल मेहता, सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे व वरिष्ठ न्यायाधीश यांनी दिली. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करणे, गरीब व गरजू पात्र व्यक्तींना मोफत वकील पुरविणे, लोक अदालतीचे आयोजन करणे, मध्यस्थी योजना राबविणे व वरिष्ठांकडून वेळोवेळी निर्देश प्राप्त झाल्याप्रमाणे योजना राबविणे इत्यादी कार्य करण्यात येतात.
यावेळी त्यांनी ग्रामपंचायतच्या ठिकाणी ग्राम विधी दक्षता व सहाय केंंद्र, पॅरा लिगल व्हालंटीयर्स योजना बचपन बचाव आंदोलनासंदर्भात १८ वर्षाखालील हरविलेले बालक व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याकरिता व त्यांना येणाऱ्या अडचणीवर मात करण्याकरिता, अत्याचार पीडित व्यक्तीस कलम ३५७ ए नुसार नुकसानभरपाई मिळवून देणे इत्यादी योजना जिल्हा विधी सेवा प्राधिकारणांमार्फत राबविल्या जातात अशी माहिती यावेळी देण्यात आली. कोणत्याही व्यक्तिला कायदेविषयक अडचणी येत असतील तर त्यांनी नि:संकोचपणे जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी पोलीस नागरिक समन्वय पोलीस मित्र योजना याबाबत उपस्थित महिला व नागरिकांना माहिती दिली. महिलांचे संरक्षणविषयक कायदे याबाबतची माहिती न्यायाधिश एस.पी. सदाफळे यांनी दिली. कार्यक्रमात सरपंच नरेंद्र टेंभरे, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष भेदीराम डोंगरे, पुरणसिंह चौधरी, अॅड.बी.जी लिल्हारे, अॅड.एच.गौतम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोती अभियान पंचायत समिती, गोेंदियाचे तालुका समन्वयक पी.टी. बिसेन, प्रशिक्षक मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते. संयोजक रामकिशोर नागवंशी यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक बी.टी. वैद्य, महेंद्र पटेले, शिवदास थोरात, आर्यचंद्र गणविर, गुरुदयाल जैतवार, अशोक लिल्हारे, हेमराज पटले, तसेच ग्रामपंचायतचे व तंटामुक्त गाव समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)