१.९९ लाख हेक्टरमध्ये खरीप पिकांचे नियोजन
By Admin | Updated: April 30, 2017 00:47 IST2017-04-30T00:47:54+5:302017-04-30T00:47:54+5:30
उन्हाळी धानपिकांसाठी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र जिल्ह्यात १ मे नंतर उघडणार आहेत.

१.९९ लाख हेक्टरमध्ये खरीप पिकांचे नियोजन
बियाण्यांची मागणी : कडधान्यांसह भाजीपाला पिकाचाही समावेश
गोंदिया : उन्हाळी धानपिकांसाठी शासकीय हमीभाव धान खरेदी केंद्र जिल्ह्यात १ मे नंतर उघडणार आहेत. शेतकरी उन्हाळी पीक विक्रीनंतर जोमाने खरिपाच्या हंगामाकडे वळणार आहे. मे व जून महिन्यात शेतजमिनीच्या मशागतीत शेतकरी व्यस्त होईल. त्यातच आता जिल्हा कृषी विभागाने सन २०१७-१८ साठी खरिपाचे नियोजन एक लाख ९९ हजार हेक्टरमध्ये केले आहे. या नियोजनात भात पिकासह मका, तूर, इतर कडधान्य व भाजीपाला पिकांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात खरिपाच्या भातपिकासाठी एक लाख ८९ हजार हेक्टरमध्ये नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मका १०० हेक्टर, तूर सात हजार ४०० हेक्टर, मूग १०० हेक्टर, उडीद १०० हेक्टर, इतर कडधान्य १०० हेक्टर, तीळ एक हजार २०० हेक्टर व भाजीपाला पिकाचे एक हजार हेक्टरमध्ये नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात प्रमाणात सिंचनाच्या सोयी नसल्यामुळे उन्हाळी धानपीक खरिपापेक्षा कमी घेतले जाते. मात्र खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना अधिक आशा असते. खरिपात चांगले उत्पन्न घेवून कर्जमुक्त जीवन जगावे, असे त्यांना वाटते. मात्र दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा निसर्गाच्या प्रकोपाने त्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो.
खरीप हंगाम २०१७-१८ साठी खताची मागणी करण्यात आली असून मंजुरी तरतूद मिळाली आहे. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)
३७ हजार ६७४ क्विंटल बियाण्यांची मागणी
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने महाबीज व खासगी कंपन्यांकडून बियाण्यांची मागणीसुद्धा केली आहे. भातपिकासाठी महाबीजकडून २५ हजार क्विंटल व खासगी कंपन्यांकडून १२ हजार ७७४ क्विंटल अशा एकूण ३७ हजार ६७४ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. याशिवाय तुरीच्या बियाण्यांची महाबीजकडून ३५० क्विंटल व खासगी कंपन्यांकडून ३५० क्विंटल, उळीदासाठी महाबीज व खासगीकडून प्रत्येकी पाच-पाच क्विंटल, मूग बियाण्यांसाठी महाबीज व खासगीकडून प्रत्येकी पाच-पाच क्विंटल व मका पिकासाठी महाबीज व खासगी कंपन्यांकडून प्रत्येकी पाच-पाच क्विंटलची मागणी करण्यात आली आहे.