गरजूंसाठी धावणारे खालसा सेवा दल सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:21+5:302021-03-18T04:28:21+5:30
गोंदिया : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक, गरजवंत तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. पण, ...

गरजूंसाठी धावणारे खालसा सेवा दल सदस्य
गोंदिया : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईक, गरजवंत तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. पण, या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलाने घेतली. दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरणाचे कार्य केले. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेत आश्रयास असलेल्या भिकाऱ्यांसह शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रुग्णांच्या नातेवाइकांना खालसा सेवा दलाकडून जेवण पुरविले जात आहे. ही सेवा केवळ लॉकडाऊनपुरतीच मर्यादित न ठेवता ती सातत्याने सुरू ठेवली आहे.
कोरोनाचा कहर वाढल्यामुळे मागील वर्षी मार्च महिन्यात अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेल्या प्रवासी आणि शहरातील भिकारी आणि निराधार नागरिकांना बसला. सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली होती. कोठे निघताही येत नाही अशा स्थितीत ते अडकले आहेत. त्यांची ही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलाने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली. खालसा सेवा दलाकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे. याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिली जात आहेत. केटीएस व बाई गंगाबाई रुग्णालय व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलाची विशेष गाडी जात आहे. अन्य रुग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहोचवत होते. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे आणि पॅकेट बनविण्यासाठी सुमारे ७०-८० महिला-पुरुषांची टीम सेवा देत होती. लॉकडाऊनच्या काळात दररोज तीन हजार गरजूंना जेवण देण्याचे महान कार्य खालसा सेवा दलाने केले.
.............
२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेत
येथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रुग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रुग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार त्यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुंबीयांना सांगितले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलाच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.
............
रुग्णांसह अनेकांना होतेय मदत
खालसा सेवा दलाकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकांवर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र, आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली. दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे अजूनही केटीएस, बीजीडब्ल्यूमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना नियमित जेवणाचा पुरवठा केला जातो. लॉकडाऊनच्या काळात खालसा सेवा दलाच्या या पुढाकाराने अनेकांना दिलासा मिळाला आहे.