अवैध विक्री करताना केरोसीन पकडले
By Admin | Updated: October 29, 2015 00:20 IST2015-10-29T00:20:25+5:302015-10-29T00:20:25+5:30
सडक-अर्जुनीजवळ असलेल्या मौजा वडेगाव येथे अवैध केरोसिन विकत असताना पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत जवळपास ५० लिटर केरोसिन पकडण्यात आले.

अवैध विक्री करताना केरोसीन पकडले
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : गावकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनीजवळ असलेल्या मौजा वडेगाव येथे अवैध केरोसिन विकत असताना पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत जवळपास ५० लिटर केरोसिन पकडण्यात आले. मात्र अवैध केरोसिन विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी तक्रार गावकऱ्यांनी करून योग्य चौकशीची मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, वडेगाव सडक येथील स्वस्त धान्य व केरोसिन वाटपाचे दुकान गिरीपाल ताराचंद फुले मु.वडेगाव यांचेकडे आहे. १५ आॅक्टोबर २०१५ ला रात्रीला १०.१५ वाजता गिरीपला फुले यांचे घरी ५० लिटर केरोसीन विकताना पकडण्यात आले. यावेळी डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पठाण आणि तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मेश्राम उपस्थित होते. यावेळी गावातील २५ ते ३० नागरिक हजर होते. परंतु चोरीने केरोसिन विकत असताना त्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला नाही व नागरिकांच्या सह्यासुध्दा घेतल्या नाही. त्यामुळे गावातील नागरिकांचा संशय वाढला आणि त्यांनी तहसीलदार व्ही.एम.परळीकर, डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार केंद्रे यांना विचारणा केली असता संबंधित केरोसिन विक्रेत्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांना कळले.
सदर स्वस्त धान्य दुकानदार गावातील कार्डधारकांना स्वस्त धान्य कमी देतो, तसेच केरोसिनही कमी वाटप करतो. उरलेला माल काळ्या बाजारात विक्री केला जाते. अशा स्वस्त धान्य दुकानदारावर योग्य चौकशी करून कार्यवाही करावी, अन्यथा गावकरी आंदोलन करतील, अशी तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदार सडक-अर्जुनी यांना केली. त्या तक्रारीच्या प्रतिलिपी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक गोंदिया, जि.प. सदस्य डव्वा, उपविभागीय अधिकारी देवरी यांना पाठवण्यात आला आहे.
या तक्रार निवेदनावर गावातील ५७ स्त्री-पुरूषांनी सह्या केल्या आहे. चौकशी होणार की नाही याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. योग्य चौकशी न झाल्यास अधिकाऱ्यांचा खरा चेहरा समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)