करटी बु. नळयोजनेत लाखोंचा भ्रष्टाचार उघड
By Admin | Updated: October 20, 2014 23:15 IST2014-10-20T23:15:32+5:302014-10-20T23:15:32+5:30
जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. येथे नवीन नळ योजनेसाठी ८९ लाख ४४ हजार २०० मंजूर करण्यात आले. लोकवर्गणी ४ लाख ५० हजार दाखविण्यात आली. लोकवर्गणी ज्या नागरिकांच्या

करटी बु. नळयोजनेत लाखोंचा भ्रष्टाचार उघड
परसवाडा : जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. येथे नवीन नळ योजनेसाठी ८९ लाख ४४ हजार २०० मंजूर करण्यात आले. लोकवर्गणी ४ लाख ५० हजार दाखविण्यात आली. लोकवर्गणी ज्या नागरिकांच्या नावे दाखविण्यात आली, त्यांनी एक ही रुपया दिला नाही. त्यांना जाणीवही नाही. यात बाहेरगावी राहणारे व शासकीय नोकरीत असणाऱ्या लोकांची नावे असल्याची माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे.
यात ३० लोकांनी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागांतर्गत लोकवर्गणी, कसल्याही प्रकारचे पैसे व सहीसुद्धा दिली नाही. नमुना सातवर नागरिकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या ग्रामसेवक महाकालकर यांनीच केल्या. अंदाजपत्रकात नवीन विहिरी मंजूर असून जुन्या विहिरीलाच रिपेअरिंग करून त्याच विहिरीचे बिल काढण्यात आले. पाईपलाईनमध्येही निकृष्ट दर्जाचे पाईप टाकण्यात आले आहेत.
नळ योजनेसाठी ग्राम पाणी पुरवठा, स्वच्छता पर्यावरण समिती ग्रामसभेव्दारे तयार करणे व त्यात ५० टक्के महिला असणे आवश्यक आहे. पण ग्रामसभेचा विचार न घेता तहकुब सभेत व गावातील नागरिकांना याची जाणीव न करता समिती गठीत करण्यात आली. यात अध्यक्ष सरपंच व सचिव ग्रामसेवक असते. पाणी पुरवठा समिती कधी गठित करण्यात आली.
यावर नागरिकांनी आक्षेपही घेतला. तरीसुद्धा पैसे काढण्यात आले. यात २५ जून २०१४ रोजी पहिला हप्ता ७ लाख ४० हजार रूपये, दुसरा हप्ता १८ जून २०१४ रोजी १७ लाख रुपये, तिसरा हप्ता तीन लाख रुपये असे एकूण २७ लाख ५० हजार रुपये योजनेवर मिळाले व खर्चही झाले आहे.
याबाबतची विचारणा ग्रामसेवक महाकालकर यांना रंजीत बागळे यांनी केले असता, समाधानकारक उत्तर न देता तुम्हाला वाटेल ते करा, उलटपुलट कामे करावीच लागतात. खोटे काम केल्याशिवाय काम होत नाही, असे ग्रामसेवकाने स्पष्ट सांगितले. तसेच अधिकाऱ्यांना, कनिष्ठ अभियंता, जि.प. सदस्य यांनाही पैसे द्यावे लागतात. जि.प. सदस्य व सरपंच कपूर पटले यांच्या मार्गदर्शनातील काम आहे. मी काय करणार? असे बागळे यांना ठणकावून सांगितले.
सदर काम विजय रहांगडाले यांच्या नावाने असून काम ठाणेगाव येथील खोब्रागडे पेटी कंत्राटदार करीत आहे. याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी व वरिष्ठांना करण्यात आली आहे.
या नवीन नळ योजनेकडे गावातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. या सर्व बाबी माहितीच्या अधिकारात करटी बु. येथील सामाजिक युवा कार्यकर्ते रंजीत बागळे यांनी उघडकीस आणली आहे. (वार्ताहर)