कलापथकाने केली एड्स जनजागृती
By Admin | Updated: March 29, 2017 01:30 IST2017-03-29T01:30:47+5:302017-03-29T01:30:47+5:30
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा कलापथकाच्या माध्यमातून ५ ते २४ मार्च दरम्यान जिल्ह्यात

कलापथकाने केली एड्स जनजागृती
एड्स नियंत्रण संस्थेचा उपक्रम : २० गावांत पोहोचले कलापथक
तिरोडा : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा कलापथकाच्या माध्यमातून ५ ते २४ मार्च दरम्यान जिल्ह्यात एचआयव्ही एड्स संबंधी जनजागृतीसाठी कलापथकाची मदत घेतली जात आहे. संस्थेच्या या नवीन उपक्रमांतर्गत कलापथकाने जिल्ह्यातील २० गावांत पथनाट्याच्या माध्यमातून एड्स जनजागृती केली.
गेल्या काही वर्षापासून एचआयव्ही एड्सच्या प्रमाणामध्ये घट होत असली तरी नव्याने निघणाऱ्या एचआयव्ही बाधितांच्या संख्येतही घट व्हावी या दृष्टीने समाजात जनजागरणाची आवश्यकता आहे. या हेतूने एचआयव्ही एड्स काय आहे, एड्सपासून स्वत:चे रक्षण कसे करावे. प्रत्येक नागरिकाने व प्रत्येक गरोदर महिलेने आपली एचआयव्ही चाचणी जरुर करावी यासारखे हा संदेश प्रत्येकांपर्यंत जावा व त्यांच्यात एड्सबाबत जनजागृती करता यावी यासाठी एड्स नियंत्रण संस्थेने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृतीचा नवा उपक्रम हाती घेतला आहे.
यांतर्गत १५ मार्च रोजी गोंदियाच्या केटीएस सामान्य रुग्णालयातून पथनाट्याला प्रारंभ झाला. आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव असा प्रवास करीत सदर कलापथक येथे दाखल झाले. तालुक्यातील बिर्शी व लाखेगाव येथे या कलापथकाने शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या पथनाट्यातून एड्स संबंधी जनजागृती केली. या कलापथकाद्वारा जिल्ह्यातील एकूण २० गावांमध्ये एड्ससंबंधी संदेश पोहोचविण्यात आला.
अत्यंत शिस्तबद्ध व मंत्रमुग्ध करणाऱ्या पथनाट्याच्या या कलापथकामध्ये वैभव कोलते, विक्रम फडके, दीपक तिघारे, अभिषेक लेंडे, पुनम हटवार व रागिनी बांते यांचा समावेश होता. जिल्हा पर्यवेक्षक संजय जेनेकर यांचे मार्गदर्शन व जिल्ह्यातील सर्व आयसीटीसी समुपदेशक तसेच दृष्टी या समाजवेसी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एड्स जनजागृती मोहीम यशस्वी करण्यात आली.
या मोहिमेसाठी त्या-त्या गावातील आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांंचेही सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)