काचेवानी परिसर होणार औद्योगिक हब
By Admin | Updated: September 24, 2014 23:36 IST2014-09-24T23:36:40+5:302014-09-24T23:36:40+5:30
गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्याचा परिसर सध्या औद्योगिक विकासात चांगलाच आघाडी घेत आहे. राज्यातील सर्वात मोठ्या अदानी वीज निर्मिती प्रकल्पानंतर आता काचेवानी परिसरात सिमेंट कारखाना

काचेवानी परिसर होणार औद्योगिक हब
काचेवानी : गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्याचा परिसर सध्या औद्योगिक विकासात चांगलाच आघाडी घेत आहे. राज्यातील सर्वात मोठ्या अदानी वीज निर्मिती प्रकल्पानंतर आता काचेवानी परिसरात सिमेंट कारखाना येऊ घातला आहे. त्यादृष्टीने जागाही आरक्षित झाल्याची माहिती मिळाली आहे.
तिरोडा शहराच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील भागात, अर्थात गोंदिया मार्गावर काचेवानी परिसरात काही नामांकित कंपन्यांचे प्रकल्प येऊ घातले आहे. याबाबतची चाचपणी काही उद्योग समुहांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे अदाणी पॉवर प्लान्टच्या आधीच, ६ वर्षापूर्वी आणि ३० वर्षापूर्वी या परिसरात एलअॅन्डटी कंपनीने सर्व्हेक्षण केले असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. एलअॅन्डटी कंपनीने काचेवानी, बरबसपुरा, मेंदीपूर, इंदोरा परिसरात सर्व्हे झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लार्सन अॅन्ड टुब्रो (एल अॅन्ड टी) कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी या सर्व्हेक्षणाची पुष्टी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, काचेवानी, बरबसपुरा आणि मेंदीपूरचा यामधील भागात हा उद्योग उभारला जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती काचेवानी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उमाशंकर चौधरी यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले. सिमेंट कारखान्याकरिता राख, पाणी, विद्युत, चुनखडी आणि केमिकलची गरज असते. चुनखडी आणि केमिकलकरिता रेल्वेची सुविधा काचेवानी ते पिंडकेपार (गोरेगाव) ला जोडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यात थोडी व्याघ्र प्रकल्पाची अडचण असली तरी लोकप्रतिनिधींनी त्याकरिता जोर लावल्यास हे काम मार्गी लागू शकते.
तिरोडा तालुक्यात राज्यातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प आल्याने इतर उद्योगांना महत्वाचा आधार झाला आहे. सिमेंट निर्मितीकरिता लागणारी राख, पाणी आणि विजेची गरज अदानी प्रकल्पामुळे भागविली जाणार आहे. अदानी प्रकल्प येथे उभारण्यासाठी सिमेंट कंपनीनेच प्रोत्साहन दिले असून त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीच शब्द टाकला होता, असे सांगितले जात आहे.
उद्योगांसाठी आवश्यक दळणवळणाची साधने, पाणी आणि पुरेशी जागा यामुळे उद्योगांना येथे प्रोत्साहन मिळत आहे. एकामागोमाग येणाऱ्या या उद्योगांमुळे काचेवानीसह लगतचा परिसर भविष्यात औद्योगिक हब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)