कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 22:14 IST2018-06-21T22:07:14+5:302018-06-21T22:14:49+5:30
आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत कचारगड येथील यात्रेनिमित्त कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ३००, ४००, ८०० मीटर दौड स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश होता.

कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धेचे बक्षीस वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
दरेकसा : आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत कचारगड येथील यात्रेनिमित्त कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ३००, ४००, ८०० मीटर दौड स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश होता. यात सर्वच स्पर्धेत शासकीय आश्रमशाळेचे विद्यार्थी प्रथम आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले.
कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धेचे आयोजन जिल्हा पोलीस कार्यालयाने केले होते. स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. परंतु शासकीय आश्रमशाळा जमाकुडो येथील विद्यार्थ्यांनी सर्वांना मागे टाकत मुले व मुलींच्या सर्व गटात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस १० हजार रुपये, ७ हजार ५०० रुपये, ५ हजार रुपयांचे पुरस्कार वितरित करण्यात आले.
मुले व मुली गटात शासकीय आश्रमशाळेची वर्षा पंधरे ३०० व ८०० मीटर गटात प्रथम, आलोक पडौती ८०० मीटरमध्ये प्रथम, विजय मडावी ५०० मीटर दौड स्पर्धेत द्वितीय, जयसिंग कुंभरे, रोहिणी तावाडे यांनी ४०० मीटर गटात तृतीय बक्षीस पटकाविले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून १७ जून रोजी आ. संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत, राजमाता फुलवादेवी कांगो यांच्या हस्ते व जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय आश्रमशाळा जमाकुडोच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
याप्रसंगी आ. पुराम यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर अशाचप्रकारे खेळामध्ये पुढे नेण्याचे आश्वासन दिले. तसेच माझ्या आदिवासी बांधवांनी जगात नाव कमवावे, यासाठी माझे प्रयत्न असतील, असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे राजमाता फुलवादेवी कांगो यांनी आश्रमशाळेचे विद्यार्थी कुठेही मागे नसल्याचे सांगितले.
सदर कार्यक्रम देवरी पोलीस मुख्यालय आवारात घेण्यात आला. त्याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी नवले, ठाणेदार बचाव, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार उपस्थित होते.
प्रास्ताविक, संचालन व आभार महिला पोलीस शिपाई मंजुके यांनी केले. शाळेतील सर्व विजयी स्पर्धकांचे मुख्याध्यापक पी.जी. कळंबे, वरिष्ठ शिक्षक कमल कापसे, भोजराज दरवडे, सुजाता मेश्राम, आर.आर. लंजे, डोडी नावाडे, कमलेश बारेवार, सोनेकर, चव्हाण, उरकुडे, उताणे, जांभूळकर, भुस्कुटे, मलखांबे, गाढवे, उमेश औरासे, वंजारी, खोब्रागडे, अधीक्षक रामटेके व अधीक्षिका फुंडे यांनी कौतुक केले.