नक्षल क्षेत्रातील नवयुवकांसाठी कबड्डी स्पर्धा व विविध उपक्रम
By Admin | Updated: November 22, 2014 00:43 IST2014-11-22T00:43:36+5:302014-11-22T00:43:36+5:30
पोलीस ठाणे चिचगडच्या वतीने नवयुवकांकरिता खुली कबड्डी स्पर्धा १६ ते १८ नोव्हेंबरपर्यंत घेण्यात आली.

नक्षल क्षेत्रातील नवयुवकांसाठी कबड्डी स्पर्धा व विविध उपक्रम
देवरी : पोलीस ठाणे चिचगडच्या वतीने नवयुवकांकरिता खुली कबड्डी स्पर्धा १६ ते १८ नोव्हेंबरपर्यंत घेण्यात आली. यात नक्षलप्रभावी क्षेत्रातील नवयुवकांनी तसेच पोलीस ठाणे परिसराला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील ग्रामीण भागातील युवकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन उत्साह दर्शविला.
सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाच हजार ५५५ रूपये, व्दितीय तीन हजार ३३३ रूपये, तृतीय दोन हजार २२२ रूपये आणि प्रोत्साहनार्थ इतर बक्षिसे ठेवण्यात आले होते. यात एकूण ४४ चमूंनी भाग घेतला. प्रथम पारितोषिक शिक्षक संघ चिचगडच्याा चमूने पटकाविले. व्दितीय क्रमांक जय दुर्गा क्रीडा मंडळ आलेवाडाच्या चमूने तर तृतीय क्रमांक जय शारदा क्रीडा मंडळ पिंडकेपारने पटकावले.
सदर बक्षिसांचा वितरण सोहळा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आयआरबी गृपचे पोलीस निरीक्षक घुगे, देवरीचे माजी उपसभापती इंदल अरकरा, चिचगडचे उपसरपंच भैसारे, अण्णा जैन, विजय कश्यप, तंमुसचे अध्यक्ष खंडारे, डॉ. ठवरे, शेख अब्दुल्ला, व्दारकाप्रसाद धरमगडे, अल्ताफ हमीद, पोलीस पाटील गणेशराम मारगाये उपस्थित होते.
मान्यवरांनी शासनाकडून राबविण्यात येत असलेले उपक्रम, योजनांचा लाभ कशारितीने मिळवून घ्यावा, वाहतूक नियम, दहशतवाद घटनांना हाताळताना कसा बचाव करता येईल, गुन्हेगारीपासून परावृत्त राहणे व देशाच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व योजनांचा लाभ मिळविण्याकरिता पोलिसांनी नि:संकोच मदत घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले. तसेच नवयुवकांनी पोलिसांच्या कामात सहकार्य करून देशविघातक कृत्य करणाऱ्या माओवादी संघटना, समाजकंटक यांना पळवून लावण्याची जबाबदारी सांभाळावी यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानाकरिता पोलीस विभागाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार आर.पी. तिवारी यांनी व संचालन पोलीस शिपाई ओमप्रकाश जामनिक यांनी केले. कार्यक्रमासाठी चिचगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक म्हस्के, पोलीस हवालदार रमेश येळे, ईस्कापे, गोमासे, मेश्राम, देशकर, कोसमे, दसरे, इंगळे, पारधी, सोनवाने, अतकर, पेटकुले, पटले व आयआरबीग्रुप औरंगाबादच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. स्पर्धेदरम्यान स्वच्छ गाव अभियानाचे पॉम्प्लेटचे वितरित करण्यात आले. (प्रतिनिधी)