कनिष्ठ सहायिका एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: April 28, 2015 01:00 IST2015-04-28T01:00:25+5:302015-04-28T01:00:25+5:30
‘ओव्हर टाईम’चे बिल काढून देण्यासाठी महिला परिचराला तीन हजार रूपयांची मागणी करून एका कर्मचाऱ्यामार्फत ती

कनिष्ठ सहायिका एसीबीच्या जाळ्यात
तीन हजार रुपयांची लाच : कवलेवाडा आरोग्य केंद्रातील कारवाई
गोंदिया : ‘ओव्हर टाईम’चे बिल काढून देण्यासाठी महिला परिचराला तीन हजार रूपयांची मागणी करून एका कर्मचाऱ्यामार्फत ती रक्कम स्वीकारताना कनिष्ठ सहायिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पथकाने सोमवारी (दि.२७) सकाळी १०.५५ वाजता दरम्यान ही कारवाई केली. सविता दयाराम राठोड (३०) असे अटक करण्यात आलेल्या महिला कर्मचारीचे नाव आहे.
तक्रारकर्त्या आरोग्य केंद्रात परिचर पदावर कार्यरत असून त्यांचे आॅगस्ट ते डिसेंबर २०१४ या काळातील ओव्हर टाईमचे सात हजार रूपयांचे बिल काढावयाचे होते. यासाठी त्यांनी बिल मंजुरीकरिता कार्यालयातील कनिष्ठ लिपीक सविता राठोड यांच्याकडे गेले.
मात्र राठोड यांनी बिल काढून देण्यासाठी तीन हजार रूपयांची मागणी करीत अन्यथा बिल पेंडींग ठेवणर असल्याचे स्पष्ट सांगितले.
यावर तक्रारकर्त्यांनी १६ एप्रिल रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने २४ एप्रिल रोजी पडताळणी केली असता कनिष्ठ सहायिका राठोड यांनी तीन हजार रूपयांची मागणी करीत कार्यालयातील कर्मचाऱ्याला रक्कम देण्यात सांगितले. त्यानुसार पथकाने सोमवारी (दि.२७) सकाळी १०.५५ वाजता दरम्यान आरोग्य केंद्रात सापळा लावला.
कनिष्ठ सहायिका राठोड यांना कार्यालयातील कर्मचाऱ्याकडून पंचांसमक्ष लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
राठोड यांच्याविरोधात गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)