मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय- त्रिवेदी
By Admin | Updated: September 26, 2015 01:55 IST2015-09-26T01:55:36+5:302015-09-26T01:55:36+5:30
मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. परस्परांशी संबंध चांगले राहतात. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रकरणे चालविण्यापेक्षा ...

मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय- त्रिवेदी
गोंदिया : मध्यस्थी प्रक्रियेमुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाचतो. परस्परांशी संबंध चांगले राहतात. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रकरणे चालविण्यापेक्षा मध्यस्थी प्रक्रियेमुळे लवकर न्याय मिळतो, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस.आर. त्रिवेदी यांनी केले.
जिल्हा न्यायालयात जिल्हा मध्यस्थी केंद्राच्या वतीने मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन न्यायाधीश त्रिवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक न्या. पी.एच. खरवडे, जिल्हा सरकारी वकील वीणा बाजपेई, जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. राजकुमार बोंबार्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्या.खरवडे म्हणाले, न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणांत विविध तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली निघत नाही. ही प्रकरणे मध्यस्थीकरिता पाठवून लवकरात लवकर निकाली काढता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. बांबोर्डे म्हणाले, मध्यस्थीने प्रकरण निकाली काढण्याकरिता पक्षकारांनी आपली मानसिकता तयार केली पाहिजे. वकिलांनी पक्षकारांची प्रकरणे मध्यस्थीकरिता ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे सांगितले. प्रास्ताविकातून अॅड. बाजपेई यांनी मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. याप्रसंगी जिल्हा न्यायालयाच्या व्यवस्थापक नलिनी भारद्वाज, जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड.आर.जी. राय, वकील संघाचे पदाधिकारी, नमाद महाविद्यालयाच्या विधी विभागाचे विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.