ग्राहक न्यायमंच दिला शेतकऱ्यांच्या विधवांना न्याय
By Admin | Updated: December 3, 2014 22:52 IST2014-12-03T22:52:20+5:302014-12-03T22:52:20+5:30
अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या विधवांचे विमा दावे नाकारणाऱ्या आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीला झटका देत ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दोन्ही महिलांना न्याय दिला.

ग्राहक न्यायमंच दिला शेतकऱ्यांच्या विधवांना न्याय
गोंदिया : अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन शेतकऱ्यांच्या विधवांचे विमा दावे नाकारणाऱ्या आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीला झटका देत ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दोन्ही महिलांना न्याय दिला. दोन्ही प्रकरणात दोन्ही विधवांना प्रत्येकी एकेक लाख रूपये दरसाल दरशेकडा ८ व ९ टक्के व्याजाने द्यावे, असा आदेश न्यायमंचाने सदर विमा कंपनीला दिला.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी येथील शेतकरी अनिल शालिकराम खोब्रागडे यांचा काळी-पिवळीने प्रवास करीत असताना ट्रकने दिलेल्या धडकेत २३ सप्टेंबर २००५ रोजी मृत्यू झाला. तर आमगाव तालुक्यातील सीतेपार येथील शेतकरी उमेदलाल गौंदन बिसेन हे आपल्या मित्राच्या दुचाकीवर मागे बसून जात असताना दुचाकीला झालेल्या अपघातात १६ मार्च २००६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृतक शेतकऱ्यांची अपघात विमा पॉलिसी आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीकडे होती. त्यामुळे दोन्ही शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी किरण अनिल खोब्रागडे व निर्मला उमेदलाल बिसेन यांनी सदर विमा कंपनीकडे प्रत्येकी एकेक लाख रूपये विमा दावा, नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यासाठी रितसर अर्ज केला. परंतु सदर कंपनीने विमा दावे निकाली काढण्यात कुचराई केल्यामुळे त्यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेवून तक्रार दाखल केली.
यानंतर न्यायमंचाने सदर विमा कंपनीला नोटीसेस बजावले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपले लेखी जबाब दाखल केले. यात पहिल्या प्रकरणात कागतपत्रे न मिळाल्याने व तक्रार मुदतबाह्य असल्यामुळे तर दुसऱ्या प्रकरणात मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने अपघात घडल्याचे सांगून दावा फेटाळल्याचे सांगितले. यावर तक्रारकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला व त्यावर न्यायमंचाने कारणमिमांसा केली.
पहिल्या प्रकरणात विधवा किरण खोब्रागडे यांनी साकोली पोलीस ठाण्यातून घटनास्थळ पंचनामा व उत्तरीय तपासणी अहवाल सादर केल्याने मृत्यू अपघाताने झाल्याचे सिद्ध झाले. तसेच तिने विमा कंपनीला वकिलामार्फत पाठविलेली नोटीस व रजिस्टर्ड पोस्टाच्या पावत्या यावरून तिने वारंवार विनंती करूनही विमा कंपनीने दावा निकाली न काढल्याचे सिद्ध झाले. तर दुसऱ्या प्रकरणात विधवा निर्मला बिसेन यांनी आमगाव पोलिसांचा घटनास्थळ पंचनामा, अपघातात पतीच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे ठाण्यातील पब्लिक डाक्युमेंटवरून व उत्तरीय तपासणी अहवालावरून सिद्ध झाले. तसेच दोन्ही तक्रारकर्त्यांच्या वकिलाने दोन्ही प्रकरणात राष्ट्रीय आयोग नवी दिल्लीच्या लक्ष्मीबाई विरूद्ध आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीच्या न्यायनिवाड्याचा दाखला दिला.
या सर्व बाबींची ग्राहक न्यायमंचाने कारणमिमांसा करून दोन्ही विधवा महिलांची तक्रार अंशत: मान्य केली. दोन्ही प्रकरणातील मृतक शेतकऱ्यांच्या विधवांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचे प्रत्येकी एकेक लाख रूपये तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून त्यांना मिळेपर्यंत दरसाल दरशेकडा ८ व ९ टक्के व्याजाने द्यावे.
दोन्ही विधवांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी १०-१० हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी पाच-पाच हजार रूपये ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)