शेतकरी विधवेला न्यायमंचचा दिलासा

By Admin | Updated: March 21, 2015 01:59 IST2015-03-21T01:59:52+5:302015-03-21T01:59:52+5:30

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल नसल्यामुळे शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याचा दावा फेटाळणाऱ्या न्यू इंडिया विमा ..

Judge Relief for the Widow of the Farmer | शेतकरी विधवेला न्यायमंचचा दिलासा

शेतकरी विधवेला न्यायमंचचा दिलासा

गोंदिया : सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचा रासायनिक विश्लेषण अहवाल नसल्यामुळे शेतकरी व्यक्तीगत अपघात विम्याचा दावा फेटाळणाऱ्या न्यू इंडिया विमा कंपनीला ग्राहक न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. एक लाख रूपये विमा रकमेसह नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश सदर कंपनीला न्यायमंचाने दिला आहे.
शांता राजेंद्र घासले रा. रेंगेपार ता. सडक-अर्जुनी असे तक्रारकर्तीचे नाव आहे. तिचे पती राजेंद्र मोहन घासले यांचा मृत्यू १६ आॅक्टोबर २०११ रोजी शेतात विषारी साप चावल्याने झाला. त्यामुळे तिने संपूर्ण कागदपत्रांसह न्यू इंडिया विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, क्षेत्रीय व्यवस्थापक व सडक-अर्जुनीचे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विमा प्रस्ताव सादर केला. विमा कंपनीने पत्र पाठवून मृतकाच्या रासायनिक विश्लेषण अहवालाची मागणी केली. तसेच तो अहवाल लवकर उपलब्ध न झाल्याने दावा फेटाळला. त्यामुळे शांताने ग्राहक न्यायमंचात धाव घेतली. सदर प्रकरणात गणपूर्ती म्हूणन न्यायमंचाचे अध्यक्ष अतुल आळशी व सदस्य वर्षा पाटील यांची उपस्थिती होती.
न्यायमंचाने तक्रार दाखल करून विरूद्ध पक्षांना नोटिस पाठविल्या. विमा कंपनीच्या व्यवस्थापकांनी हजर होवून आपला जबाब नोंदविला. पण तालुका कृषी अधिकारी अनुपस्थित असल्याने प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला. विमा कंपनीने आपल्या जबाबात, तक्रारकर्तीने मृतक पतीचा रासायनिक विश्लेषण अहवाल सादर केला नाही. तसेच मृत्यूचे कारणही कुठेच रेकार्डवर नसल्यामुळे दावा खारिज करण्याची मागणी केली.
यावर तक्रारकर्तीकडून अ‍ॅड. उदय क्षिरसागर यांनी युक्तिवाद केला. सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे कारण उत्तरीय तपासणी अहवालात नमूद नसले तरी पोलीस चौकशी दस्तावेज व पोलीस पाटील यांच्या प्रमाणपत्रांवरून तो सर्पदंशाने मरण पावल्याचे स्पष्ट नमूद आहे. असे असतानाही रासायनिक विश्लेषण अहवालाची मागणी करणे गैर आहे. तसेच दावा विहीत मुदतीत असून मृत्यूवेळी विमा संरक्षण लागू होते. विमा कंपनीने सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्तीची तक्रार मंजूर होण्यास पात्र असल्याचे सांगितले. तर विमा कंपनीकडून अ‍ॅड. इंदिरा बघेले यांनी युक्तिवाद करून रासायनिक अहवाल, एफआयआर, पोलीस अहवाल, पंचनामा, फोरेंसिक लॅब रिपोर्ट, उत्तरीय तपासणी अहवाल आदी दस्तऐवज तसेच मृत्यूचे कारण कुठेही आले नसल्याने तक्रार खारिज करण्याची मागणी केली. यावर न्यायमंचाने कारणमिमांसा केली. राजेंद्र घासले यांचा मृत्यू सर्पदंशाने उपचारादरम्यान झाला. त्यांच्या नावे शेतजमीन असल्याने ते अपघात विम्याचे लाभधारक आहेत. रासायनिक अहवाल व मृत्यूच्या कारणाविषयी कुठलेही दस्तऐवज नसल्यामुळे विमा कंपनीने दावा फेटाळला. परंतु पोलीस चौकशी अहवालात राजेंद्र यांना १६ आॅक्टोबर २०११ रोजी सर्पदंश झाला. नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान २७ आॅक्टोबर २०११ रोजी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. शिवाय अ‍ॅड. क्षिरसागर यांनी राज्य आयोगाचे न्यायनिवाडे सदर प्रकरणात सादर केले. यावरून न्यायमंचाने शांता घासले यांची तक्रार मान्य केली. मृतक पतीच्या अपघात विम्याची रक्कम एक लाख रूपये १७ जानेवारी २०१२ पासून दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने द्यावे, शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसान भरपाई १० हजार रूपये, तक्रारीचा खर्च पाच हजार रूपये आदेशाची पत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत द्यावे, असा आदेश न्यायमंचाने सदर विमा कंपनीला दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Judge Relief for the Widow of the Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.