तीनही घटकांना एकत्रित आणणारा जयंती उत्सव

By Admin | Updated: April 2, 2015 01:15 IST2015-04-02T01:15:38+5:302015-04-02T01:15:38+5:30

जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आणि २४ वे तिर्थंकर भगवान महाविरांचा जयंती उत्सव साजरा करण्याची गोंदियात अनोखी परंपरा आहे.

Jointly celebrating the three elements together | तीनही घटकांना एकत्रित आणणारा जयंती उत्सव

तीनही घटकांना एकत्रित आणणारा जयंती उत्सव

लोकमत दिन विशेष
मनोज ताजने गोंदिया
जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आणि २४ वे तिर्थंकर भगवान महाविरांचा जयंती उत्सव साजरा करण्याची गोंदियात अनोखी परंपरा आहे. केवळ दिगंबरपंथीयच नाही तर श्वेतांबर आणि स्थानकवासी अशा तीनही घटकांचा सहभाग असणारा हा जयंती उत्सव गोंदियावासीयांसाठी एक आदर्श उत्सव ठरत आहे.
साधारणत: ११० वर्षापूर्वी गोंदियात जैन समाजाची ४-५ घरे होती. गोंदियाच्या मुख्य मार्केट परिसरात राहणाऱ्या त्यापैकी एका परिवाराने गोरेलाल चौकातील आपली जागा जैन समाजाला दान देऊन तिथे दिगंबर जैन मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून दरवर्षी महावीर जयंतीचा कार्यक्रम या मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
सकाळी ७ वाजता प्रभातफेरी, दुपारी शोभायात्रा, सरकारी रुग्णांलयांमधील रुग्णांना फळांचे वाटप, समाजबांधवांचे सामूहिक भोजन आणि संध्याकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशी भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर असते. या कार्यक्रमांसाठी जैन मंदिराचे मुख्य ट्रस्टी आ.राजेंद्र जैन यांच्यासह ट्रस्टी सीए विनोद जैन, सुकूमार जैन, अशोक जैन यांचा विशेष पुढाकार व मार्गदर्शन असते.
गोंदियात भगवान महावीरांची जयंती सर्व समाजबांधवांच्या एकोप्याने आणि मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. सर्व पंथियांचे लोक त्यात सहभागी होतात आणि भगवान महावीरांच्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा संकल्प करतात.
जैन मंदिच्या उभारणीनंतर येथे दरवर्षी पर्युषण पर्व, वर्षातून तीन वेळा सिद्धचक्र विधान सोहळा होतो. याशिवाय मुनी महाराजांचा मुक्काम आणि समाजबांधवांसाठी प्रवचनाचा कार्यक्रम होत असतो.
गोंदियात आज जैन समाजाची लोकसंख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे हे जैन मंदिर सर्वांसाठी श्रद्धास्थान आहे. इतर समाजातील लोकही येथे श्रद्धेने नतमस्तक होतात.

जैन मंदिराचा जीर्णोद्धार
मुख्य मार्केट परिसर असलेल्या गोरेलाल चौकातील जवळपास २००० वर्ग फूट जागेवर ११० वर्षापूर्वी छोटेसे मंदिर बांधले होते. मात्र २००६ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्वार करण्यात आला. आता हे तीन मजली आकर्षक मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. यात तळमजल्यावर भगवान आदीनाथ, भगवान भरत आणि भगवान बाहुबलींची मूर्ती, पहिल्या मजल्यावर भगवान आदिनाथ, मूल्यनायक चंद्रप्रभ भगवान आणि भगवान महावीरांची तर दुसऱ्या मजल्यावर पद्मप्रभ भगवानासह सर्व तिर्थंकराच्या मूर्त्या आहेत.
मंदिराचा जीर्णोद्वार करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च लागल्याचे सांगितले जाते. जबलपूरचे अभियंता सुनील जैन यांनी या मंदिराचे डिझाईन तयार केले. त्यासाठी त्यांनी राजस्थान व मध्यप्रदेशातील काही जैन मंदिरांचा अभ्यास केला. याशिवाय आतील काचेचे काम सुभाषकुमार कुमावत यांनी केले.

Web Title: Jointly celebrating the three elements together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.