जय श्रीराम व जय झुलेलालचा गजराने दुमदुमले शहर
By Admin | Updated: March 22, 2015 00:53 IST2015-03-22T00:53:28+5:302015-03-22T00:53:28+5:30
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने आणि सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल ...

जय श्रीराम व जय झुलेलालचा गजराने दुमदुमले शहर
गोंदिया : विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने आणि सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेने शनिवारी गोंदिया शहर दुमदुमून गेले. जय श्रीराम आणि जय झुलेलालचा गजर करीत या शोभायात्रेने गोंदियावासीयांचे लक्ष वेधून घेतले.
येथील सिव्हील लाईन्स, हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची तर सिंधी कॉलनीतून साई झुलेलाल यांची शोभायात्रा निघाली होती. मराठी नववर्षाला शनिवारपासून (दि.२१) प्रारंभ झाला. चैत्र नवरात्रोत्सवालाही सुरूवात झाली. गुढीपाडवा ते रामनवमी या काळासाठी गोंदियात श्रीरामाच्या मूर्तीची वाजतगाजत येऊन स्थापना केली जाते. शहरातील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करून नऊ दिवस पूजा-अर्चना केली जाते. त्यासाठी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात शोभायात्रा काढली जाते.
यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस व नववर्ष असल्याने सिंधी समाजाचीही शहरात शोभायात्रा निघाली होती. हजारोंच्या संख्येत सिंधी बांधव त्यात सहभागी झाले होते. या शोभायात्रेतील आकर्षक देखाव्यांनी मन मोहून घेतले. सिंधी कॉलनीतून ढोलताशांच्या गजरात नाचत गात निघालेली ही शोभायात्रा मुख्य मार्गाने फिरली. (शहर प्रतिनिधी)
बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मागील कित्येक वर्षांपासून प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करण्यात येत आहे. त्यानुसार यंदाही येथील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.नऊ दिवसांसाठी स्थापना करण्यात आलेल्या या मुर्तीची विधिवत पूजन केले जाते.
शहरात सिंधी समाजबांधवांची मोठी संख्या असून त्यांच्या आद्य दैवतांचा जयंती दिवस असल्याने शोभायात्रेत सहभागी बांधवांसाठी शहरातील चौकाचौकांत चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तसेच पेय शोभायात्रेतील बांधवांना देताना सिंधी समाजबांधव दिसून आले.
बाजारपेठेतील सुमारे ७० टक्के सिंधी समाजातील व्यापारी आहेत. आज झुलेलाल जयंतीनिमित्त सिंधी नवयुवक सेवा मंडळाकडून दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील समस्त सिंधी बांधवांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.