‘आयटीआय’चे विद्यार्थी घाणीच्या साम्राज्यात
By Admin | Updated: November 19, 2015 02:19 IST2015-11-19T02:19:09+5:302015-11-19T02:19:09+5:30
आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केले.

‘आयटीआय’चे विद्यार्थी घाणीच्या साम्राज्यात
वीज, पाण्याचा अपव्यय : कोट्यवधीची इमारत ढाळतेय अश्रू
सालेकसा : आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केले. कोटीच्या घरात पैसे खर्च करून सुसज्ज इमारत उभी केली. मात्र आज त्या इमारतीची चांगलीच वाताहात झाली आहे. कोणतीही देखभाल नसल्यामुळे अक्षरश: घाणीच्या विळख्यात तेथील विद्यार्थ्यांना विद्याग्रहणाचे कार्य करावे लागत आहे.
स्वच्छतेचे एवढे धिंडवडे उडाले आहेत की शौचालय, मुत्रीघर, वॉश बेसिन, स्नानगृह कुठेही स्वत:चा दिसत नाही. एवढेच नाही तर नळातून, बेसीनमधून सतत पाणी वाया जाऊन पाण्याचा अपव्यय होत आहे. दुसरीकडे कोणी असो किंवा नसो, पंखे व इतर विजेची उपकरणे सतत सुरू असतात. यामुळे या आयटीआयमध्ये कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही की काय? अशी शंका यायला लागते. एकीकडे स्वच्छ भारत मिशन अभियान राबवून स्वच्छता राखण्याची शपथ घेतली जात असताना इथे मात्र या अभियानाची चक्क थट्टा केली जात आहे.
वीज आणि पाणी या महत्वाच्या घटकांची बचत करण्याऐवजी त्याचा सतत अपव्यय केला जात आहे. या शासकीय आयटीआयमध्ये आपली जवाबदारी सांभाळणारा कोणी आहे की नाही किंवा यावर शासनाचे नियंत्रण आहे की नाही? अशी शंका येथील चित्र पाहिल्यानंतर येते.
‘लोकमत’ने या आयटीआय कॉलेजमध्ये अनेक वेळा भेट दिली असता प्रत्येक वेळी हेच वातावरण दिसून आले. याबाबत चर्चा करण्यासाठी प्राचार्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गैरहजर असल्याने त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. शेवटी एक दिवस त्यांची भेट झाली व त्यांच्या परवानगीने लोकमत चमुने तेथील आयटीआय परिसरात पाहणी केली. तेव्हा सर्वत्र अव्यवस्था व घाण पसरलेले दृश्य दिसून आले.
आदिवासी अतिदुर्गम भागात शेवटच्या घटकापर्यंत कौशल्य विकास व्हावा व व्यवसायिक शिक्षण पोहोचावे या उद्देशाने शासनाकडून सालेकसा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केली. त्यात आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. वेळोवेळी शासनाकडून वाटेल तेवढा निधी दिला जात असतो, परंतु खऱ्या अर्थाने याचा सदुपयोग होताना दिसून येत नाही.
तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी अशा ठिकाणी येवून कधी पाहणी करतात की नाही, किंवा कागदी घोडे नाचवून केवळ आकड्यांचा खेळ करतात का, असा प्रश्न येथील चित्र पाहिल्यानंतर पडल्याशिवाय राहात नाही.