अनैतिक संबंधातूनच झाली फुलवंताची हत्या
By Admin | Updated: November 18, 2014 22:57 IST2014-11-18T22:57:12+5:302014-11-18T22:57:12+5:30
तब्बल १२ वर्षांपासून एका इसमाशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्या इसमाला पैसे मागितले. यामुळे चिडून जाऊन त्या प्रियकराने फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेचा गळा आवळून तिची हत्या

अनैतिक संबंधातूनच झाली फुलवंताची हत्या
आरोपीला अटक : पैशासाठी तगादा लावल्याने संपविल्याची प्रियकराची कबुली
गोंदिया : तब्बल १२ वर्षांपासून एका इसमाशी असलेल्या अनैतिक संबंधातून त्या इसमाला पैसे मागितले. यामुळे चिडून जाऊन त्या प्रियकराने फुलवंता शिवचरण जमरे (४२) या महिलेचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अवघ्या ३६ तासात या घटनेचा छडा लावून या घटनेतील सत्य उजेडात आणले.
कासा येथील फुलवंत जमरे (४२) ही महिला रविवारी काटी येथील आठवडी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेली. तिथे तिचा प्रियकर अमर दसरु जमरे (४५) रा.कासा हा भेटला. दोघांच्या चर्चेनंतर त्यांनी शारीरिक संबध प्रस्थापित करण्याचे ठरविले. त्यासाठी ते काटी येथील सुखदास पाचे यांच्या शेतात गेले. अमरने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर घरी जायला निघाला असताना फुलवंताने त्याला ५०० रुपयांची मागणी केली. परंतु त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावर फुलवंताने त्याच्या खिश्यात हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे अमरला राग आला. या रागाच्या भरात त्याने आपल्या घरात बैलासाठी घेतलेली वेसन व लाल रुमालाने तिचा गळा आवळून खून केला.
गळा आवळल्यामुळे मरण पावलेल्या फुलवंताला पाहून तो घाबरला. त्याने हे प्रकरण आपल्यावर येऊ नये यासाठी पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने फुलवंताचा मृतदेह त्याच शेतात असलेल्या धानाच्या पुंजण्यात टाकला. त्यानंतर बीडी पेटविली व नंतर आग लावून निघून गेला. या प्रकरणात पोलिसांनी फुलवंतावर कुणाचे देणे-घेणे तर नाही, जुने वैमनस्य तर नाही, या बाबी तपासून पाहिल्या. त्यांनी गावातील आठ लोकांना चौकशीकरिता बोलाविले होते. त्यात अमर दसरू जमरे याने सदर गुन्हा केल्याची कबूली पोलिसांना दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते व ठाणेदार सुरेश निंबाळकर यांनी पत्रपरिषदेत दिली.
आरोपी अमर जमरे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फुलवंतासोबत त्याचे १२ वर्षापासून अनैतिक संबंध होते. त्यामुळेच बाजारात भेटलेल्या फुलवंताला घेऊन तो शेतात गेला. तिने घरी परतताना पैशाची मागणी केली. यात दोघांमध्ये झटापट झाली. तिच्या नेहमीच्या पैसे मागण्याच्या सवयीमुळे आपण वैतागलो होतो. घटनेच्या दिवशी तिने खिश्यात हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असताना सदर प्रकार घडल्याचे त्याने सांगितले.
या झटापटीत फुलवंताचे नख अमरच्या शरीराला लागल्यामुळे त्यालाही इजा झाल्याचे डॉक्टरच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात वैद्यकीय व शारीरिक पुरावे गोळा केले आहेत. (तालुका प्रतिनिधी)