आमगाववासीयांना श्वास घेणे झाले अवघड
By Admin | Updated: May 18, 2014 23:42 IST2014-05-18T23:42:41+5:302014-05-18T23:42:41+5:30
आमगावच्या रिसामा परिसरातील एका राईस मिलमध्ये कुजलेले धान्य दळत असल्यामुळे मागील तीन दिवसांपासून आमगाववासीयांना श्वास घेणे कठीण झाले आहे.

आमगाववासीयांना श्वास घेणे झाले अवघड
गोंदिया : आमगावच्या रिसामा परिसरातील एका राईस मिलमध्ये कुजलेले धान्य दळत असल्यामुळे मागील तीन दिवसांपासून आमगाववासीयांना श्वास घेणे कठीण झाले आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी त्या राईस मिल चालकावर कारवाई करण्यासाठी तहसीलदाराला साकडे घातले आहे. आमगावच्या रिसामा येथील एक राईस मिल मालक मागील तीन दिवसांपासून कुजलेले धान दळत असल्याने या राईस मिलमधून मोठ्या प्रमाणात धूर वातावरणात पसरत आहे. या मिलपासून दोन ते तीन कि.मी. अंतरावर हा धूर पसरत असल्याने हवेच्या माध्यमातून तोंडावाटे गळ्यात धूर जाऊन घशाचा त्रास अनेकांना जाणवत आहे. हे सडलेले धान्य दळले तर त्यातून निघणारा धूर हवेत पसरुन नागरिक आपल्यावर कारवाईची मागणी करतील या भीतीपोटी त्या राईस मिल मालकाने हे कुजलेले धान रात्रीच्यावेळी दळायला सुरुवात केली. सायंकाळी ७.३० वाजतापासून ते पहाटेच्या ४ वाजतापर्यंत हे धान दळले जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वातावरणात हा धूर पसरला तरी लोकांच्या लक्षात येणार नाही असे गृहीत धरून राईस मिल मालकाने धान दळणे सुरू केले. मात्र या मिलपासून एक कि.मी.च्या आत असलेल्या नागरिकांना याचा बराच त्रास झाला. आमगावची बँक कॉलनी, गायत्री मंदिर परिसर, आंबेडकर चौक, गोंदिया रोड, बसस्थानक व रिसामा परिसरातील नागरिकांना याचा बराच त्रास झाला. आमगावला सायंकाळ होताच हे सडके धान्य दळण्यात येत असल्यामुळे हवेत ओल्या मातीची दुर्गंधी नागरिकांना नाकाद्वारे लक्षात येते. हवेत या धुराचे कण उडत असल्यामुळे अनेकांना डोळ्याचा त्रासही जाणवू लागला आहे. बँक कॉलनीतील लोकांना या धुरामुळे श्वास घेणे कठीण झाल्यामुळे त्यांनी शुक्रवारच्या रात्री याच बँक कॉलनीत वास्तव्यास असलेल्या तहसीलदारांचे रात्रीच्यावेळी दार ठोठावले. त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या धुरावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी तहसीलदार शक्करवार यांच्याकडे मागणी केली आहे. मागील तीन दिवसांपासून या धुराचा त्रास नागरिकांना होत असून नागरिकांना या धुरामुळे विविध आजाराला बळी पडावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)