कलावंतांना मानधनास आताही विलंबच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:30 IST2021-04-22T04:30:41+5:302021-04-22T04:30:41+5:30
कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष केशोरी : येथील ग्रामपंचायतस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये ...

कलावंतांना मानधनास आताही विलंबच
कचरापेट्यांकडे आहे दुर्लक्ष
केशोरी : येथील ग्रामपंचायतस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेट्या बसविण्यात आल्या. मात्र, या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यावरून ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष आहे हे दिसून येते.
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला
सालेकसा : सध्या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी व ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे शिवाय गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे बोगस डॉक्टरांची चांदी आहे. ग्रामीण मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांकडून ग्रामीण भागांत लूट केली जाते.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा
तिरोडा : शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मात्र याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा त्रास होत आहे.
तेंदूपत्त्याचे बोनस त्वरित द्या
इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्राम इटखेडा येथील फळीवर सन २०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा
गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.
निराधारांचे अनुदान त्वरित द्या
शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील ३-४ महिन्यांपासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
दिवसाही सुरू असतात पथदिवे
गोंदिया : नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेवर विजेचा भुर्दंड बसतो.
स्मशान शेड केव्हा तयार करणार
मुंडीकोटा : नवेगाव (खुर्द) येथे बऱ्याच वर्षांपासून स्मशानशेड नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची मोठी अडचण निर्माण होते. शेड उभारण्याची मागणी होत आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार करणे सुरू केले आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट
सालेकसा : जागतिकीकरणामुळे विविध आधुनिक साहित्य उपलब्ध होत आहे. ओघानेच आधुनिक केरसुणीमुळे पारंपरिक झाडू व्यवसाय हद्दपार होण्याच्या मार्गावर आला असल्याचे दिसत आहे.
केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता
केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी गावाच्या मध्यभागातून रस्ता असल्याने येथे वर्दळ असून धोका वाढला आहे. या रस्त्याला पर्याय म्हणून बायपास रस्ता अजूनही तयार झाला नाही.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वेस्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधी पसरते. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते.