बिरसी विमानतळ सुरक्षारक्षकांचा मुद्दा जाणार दिल्लीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:40+5:302021-02-08T04:25:40+5:30
गोंदिया : जवळील बिरसी विमानतळ येथून नोकरीवरून काढण्यात आलेले २३ सुरक्षारक्षक कर्मचारी नोकरीवर पुन्हा घेण्यात यावे, या मागणीसाठी आपल्या ...

बिरसी विमानतळ सुरक्षारक्षकांचा मुद्दा जाणार दिल्लीला
गोंदिया : जवळील बिरसी विमानतळ येथून नोकरीवरून काढण्यात आलेले २३ सुरक्षारक्षक कर्मचारी नोकरीवर पुन्हा घेण्यात यावे, या मागणीसाठी आपल्या कुटुंबियांसह १९ जानेवारीपासून विमानतळाबाहेर आंदोलनाला बसले आहेत. त्यांची बिरसी विमानतळ प्राधिकरण समिती अध्यक्ष खासदार सुनील मेंढे व आमदार विनोद अग्रवाल यांनी शनिवारी (दि. ६) भेट घेतली. याप्रसंगी खासदार मेंढे यांनी आता त्यांचा मुद्दा दिल्ले येथे मांडणार असून, मंत्रालयात बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
जवळील बिरसी विमानतळ येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत २३ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. अशात नोकरीवर परत घ्यावे, अशी मागणी करीत ते आपल्या कुटुंबीयांसह १९ जानेवारीपासून आंदोलनाला बसले आहेत. यावर शनिवारी (दि. ६) खासदार मेंढे व आमदार अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेतली. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, मगील १५ वर्षांपासून सेवा देत असलेल्या या कर्मचाऱ्यांना अचानक काढून त्यांच्या जागी ३७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे. सन १००४ पासून डीजीआर कायदा लागू असताना त्यांना १५ वर्षे कामावर न हटविता आता अचानक हटवून धोका करण्यात आला असल्याचे आमदार अग्रवाल यांनी खासदार मेंढे यांना सांगत त्यांचे याकडे लक्ष केंद्रीत केले.
त्याचप्रकारे, विमानतळात आपली जागा गमावून बसलेले १०६ प्रकल्पग्रस्त परिवार पुनर्वसन व मोबदल्यासाठी मागील कित्येक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून पैसा दिल्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडून त्यांना मोबदल्याची रक्कम दिली जात नसल्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगीतले. तसेच यांना नोकरीवर घेण्यासाठी आता दिल्ली येथे डीजीआर व सीएमडी सोबत बैठक घेऊन समाधान करावे. शिवाय १०६ प्रकल्पग्रस्त कुटुुंबांना मोबदल्याची रक्कम सन २००७ च्या दराने न देता वर्तमान दराने वाढवून देत २३ सुविधांच्या शर्तीनुसार त्यांना पुनर्वसाचा लाभ द्यावा, असे सांगितले. यावर खासदार मेंढे यांनी, लवकरच आमदार अग्रवाल यांच्या उपस्थितीत बिरसी विमानतळ प्राधिकरण, डीजीआर व सीएमडी अधिकाऱ्यांची दिल्ली येथे बैठक घेणार व यामध्ये आंदोलकर्त्या कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राहणार असे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर परत घ्यावे, यासाठी मी सोबत असल्याचेही आश्वासन दिले.
---------------------------
प्रकल्पग्रस्तांसाठी १८ व १९ रोजी बैठक
याप्रसंगी खासदार मेंढे यांनी १०६ प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबांना वाढवून मोबदला मिळावा व सर्व सुविधा त्यांना मिळाव्यात, यासाठी १८ व १९ तारखेला जिल्हा प्रशासन तसेच विमानपत्तन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसोबत आंदोलन स्थळी संयुक्त बैठक करणार असे सांगितले. या प्रकरणातही त्यांचे समाधान त्वरित व्हावे, यासाठी चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.